
अमळनेर : अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या उदघाटन प्रसंगी व अर्थसंकल्पात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सानेगुरुजी कर्मभूमी स्मारक उपक्रम केंद्र उभारणीस निधी देण्याची कबुली दिली होती. तो निधी मिळवून द्यावा यासाठी स्मारक समितीने आमदार अनिल पाटील यांना साकडे घातले आहे.

आमदार पाटील यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की आपल्या प्रयत्नाने मदतीने अजित पवारांनी अर्थसंकल्पात उल्लेख केला त्याबद्दल आपले आभारी आहोत. वर्ष उलटले तरी निधी मिळालेला नसल्याने स्मारक समितीने आता पाठपुरावा सुरू केला आहे. सानेगुरुजींचा विचार व वारसा जोपासणे ,वाढवणे आणि नविन पिढी घडवणे यासाठी कृतिशील कर्मभूमी स्मारक उभारणीसाठी स्मारक समितीने २००८ पासून प्रयत्न सुरू करून १३ एकर जागा खरेदी केली व त्यात पर्यावरण संवर्धन केले जात आहे. खान्देशातील युवा वर्गाचे क्षमता विकास ,आर्थिक ,सामाजिक ,राजकीय विकासासाठी तसेच संवर्धनासाठी रचनात्मक उभारणी आवश्यक आहे. त्यासाठी २०१६-१७ पासून महाराष्ट्र शासनाकडे पाठपुरावा सुरू आहे. म्हणून प्रस्तावित ऍक्टिव्हिटी सेंटर साठी आगामी अर्थसंकल्पात तरतूद करावी आणि अजित पवारांच्या आश्वासनाची पूर्ती होण्यासाठी प्रयत्न करावेत अशी मागणी समिती अध्यक्ष डॉ ए जी सराफ ,कार्यवाह दर्शना पवार , गोपाळ नेवे , अविनाश पाटील ,चेतन सोनार यांनी आमदार अनिल पाटील यांना केली आहे.
अपूर्ण राहिलेल्या कंपाऊंडचे ही काम पूर्ण करा….
सानेगुरुजी कर्मभूमी स्मारकावर अपूर्ण राहिलेले कंपाऊंड पूर्ण करण्याचे काम जिल्हा नियोजन समितीच्या आराखड्यात घ्यावे आणि निधी मंजूर करावा अशी मागणी सानेगुरुजी कर्मभूमी स्मारक प्रतिष्ठान ने पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्यासह जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.