
अमळनेर : तापी नदी पात्रात पुन्हा बांध टाकून वाळू वाहतूक करण्याचा प्रयत्न उपविभागीय अधिकारी यांनी हाणून पाडला असून चोपडा तालुक्यातील धुपे घाडवेल जवळचा मातीचा बांध फोडण्यात आला आहे.

गेल्या काही दिवसांपूर्वी अनवर्दे बुधगाव जवळ तापी नदीत मातीचा मोठा बांध टाकून सर्रास वाळू वाहतूक केली जात होती. प्रांत मुंडावरे यांनी अमळनेर व चोपडा तहसीलदारांना सांगून तलाठीच्या मार्फत मातीचा बांध फोडला होता. वाळू चोरांनी पुन्हा मातीचा बांध जोडून वाहतूक सुरू केली होती. पुन्हा महसूल पथकाने बांध फोडून रस्ता उद्धवस्त केला होता. याच गावांच्या बाजूला दीड किमी अंतरावर वाळू चोरांनी धुपे घाडवेल जवळ माती बांध टाकून वाळू वाहतूक सुरू केली होती. उपविभागीय अधिकारी नितीनकुमार मुंडावरे याना ही माहिती मिळताच त्यांनी चहार्डी मंडळाधिकारी सुरेश पाटील , बुधगाव तलाठी भूषण पवार , दोंडवाडे तलाठी तिलेश पवार , वेले तलाठी नोकाराम हिंगे , घाडवेल तलाठी संदीप सूर्यवंशी ,पोलीस पाटील ,कोतवाल गौतम भिल यांचे पथक पाठवून जेसीबी मशीन च्या साहाय्याने बांध तोडून वाळू चोरांच्या मनसुभ्यावर पाणी फेरले आहे. महसूल विभागाने तीन वेळा दोन वेगवेगळ्या ठिकाणी बांध तोडले. चोरटे देखील पुन्हा नव्याने बांध टाकून वाळू वाहतूक नव्याने सुरू करतात. पोलीस महसूल संयुक्त पथकाने वाळू चोरांवर गुन्हे दाखल करावेत त्याचप्रमाणे नदीचा ताबा असलेले तापी महामंडळाने देखील बेकायदेशीर बांध टाकणाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी होत आहे.