
पत्रकारांच्या क्रिकेट स्पर्धेत आर जे पाटील ठरले ‛मॅन ऑफ दि सिरीज’…
अमळनेर – पत्रकारांनी पत्रकारांसाठी आयोजित केलेल्या महाराष्ट्रातील पहिल्या पत्रकार प्रीमियर लीग पर्व १ चा समारोप सोहळा दि.१२ फेब्रुवारी रोजी जळगावात मोठ्या उत्साहात पार पडला. तीन दिवस शिवतीर्थ मैदानावर चालेल्या स्पर्धेत चाळीसगाव संघाने अंतिम सामन्यात जळगाव प्रिंट मीडिया संघाला पराभूत करत विजयी चषक पटकावला. अंतिम सामन्यात दोन्ही संघांनी चुरशीचा खेळ दाखवला, परंतु चाळीसगाव संघाने बाजी मारली.तर सुरवातीपासून फार्मात असलेला अमळनेर पत्रकारांचा संघ तिसऱ्या बक्षिसाचा मानकरी ठरला.

शिवतीर्थ मैदानावर ग्रामविकास मंत्री ना गिरीश महाजन,माजी मंत्री आ अनिल पाटील, आ राजू मामा भोळे,जिल्हाधिकारी आयुष प्रसाद व पोलीस अधिक्षक महेशकुमार रेड्डी यांच्या उपस्थितीत उदघाटनाचे सामने झाल्यानंतर 12 रोजी पालकमंत्री ना.गुलाबराव पाटील यांच्या उपस्थितीत अंतिम सामना खेळवण्यात आला. स्पर्धेच्या माध्यमातून पत्रकारांमधील खेळाडू वृत्तीला प्रोत्साहन मिळाले. पत्रकारांनी आपल्या धावपळीच्या जीवनात स्वतःसाठी वेळ काढावा आणि जीवनाचा आनंद घ्यावा असे मत त्यांनी व्यक्त केले. प्रसंगी जिल्हाधिकारी डॉ.आयुष प्रसाद, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावीत, धरणगावचे नगराध्यक्ष निलेश चौधरी, शिवसेना (उबाठा) महानगराध्यक्ष शरद तायडे, महाराष्ट्र पणन महासंघाचे उपाध्यक्ष रोहित निकम, जैन उद्योग समूहाचे अनिल जोशी, रमेशकुमार मुनोत, विक्रम मुनोत, पत्रकार सुनील पाटील, निलेश अजमेरा, नंदकिशोर पाटील आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन अयाज मोहसीन, संदीप केदार यांनी केले.
महाराष्ट्रात प्रथमच स्पर्धेचे आयोजन
पत्रकारांसाठी महाराष्ट्रात प्रथमच पत्रकार प्रीमियर लीगचे आयोजन करण्यात आले होते.जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील संघांनी यात सहभाग नोंदविला,या लीग मध्ये चाळीसगाव,प्रिंट मीडिया,अमळनेर संघ व एरंडोल या संघांनी खेळाचे उत्तम प्रदर्शन दाखविले.आयोजक समितीचे वाल्मीक जोशी, चेतन वाणी, किशोर पाटील, जकी अहमद, सचिन गोसावी, वसीम खान, यामिनी कुलकर्णी यांच्या उपस्थितीत सर्व सामने झाले. पहिल्याच दिवशी दिवस रात्र पद्धतीने ८ सामने खेळवण्यात आले.
असा राहिला निकाल आणि सहभागी संघ
तीन दिवसीय स्पर्धेत अंतिम विजेता चाळीसगाव संघ ठरला तर उपविजेता संघ जळगाव प्रिंट मीडिया संघ ठरला. तिसऱ्या क्रमांकाचे पारितोषिक अमळनेर संघाने तर चतुर्थ क्रमांक धरणगाव संघाने पटकावला. स्पर्धेचा मॅन ऑफ द सिरीज अमळनेर संघाचा आर.जे.पाटील, बेस्ट बॉलर चाळीसगाव संघाचा रवींद्र कोष्टी तर बेस्ट बॅट्समन चाळीसगाव संघाचा महेश पाटील हा खेळाडू ठरला.आणि अमळनेर चे आबीद शेख यांना जेष्ठ पण तंदुरुस्त खेळाडू म्हणून सन्मानित करण्यात आले.स्पर्धेत जळगाव प्रिंट मीडिया, युट्युब मीडिया, वेब मीडिया, डिजिटल मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया, फोटोग्राफर, संपादक, एरंडोल, अमळनेर, चोपडा, यावल, धरणगाव, मुक्ताईनगर, भुसावळ, रावेर, चाळीसगाव, पाचोरा, जिल्हाधिकारी कार्यालय, पोलीस अधीक्षक कार्यालय या संघांनी आपला सहभाग नोंदवला. स्पर्धेत पालकमंत्री गुलाबराव पाटील, मंत्री गिरीश महाजन, माजी मंत्री आ.अनिल पाटील, यांनी देखील खेळण्याचा आनंद लुटला.
अमळनेर संघ सुरवातीपासुन चमकला
केवळ तीन ते चार दिवसांच्या सरावावर अमळनेर संघ सुरवातीपासुनच या लीग मध्ये चमकला,कर्णधार संजय पाटील यांच्या नेतृत्वाखाली असलेल्या या संघात आर जे पाटील,किरण पाटील,महेंद्र रामोशे,महेंद्र पाटील,उमेश काटे, जितेंद्र ठाकूर,चेतन राजपुत, संदीप सोनवणे,आबीद शेख,मुन्ना शेख,राहुल बहीरम, कमलेश वानखेडे,युवराज पाटील,प्रविण वानखेडे आदींनी सहभाग नोंदविला, आर जे पाटील हे प्रत्येक सामन्यात अत्यंत तुफान खेळल्याने थेट मॅन ऑफ दं सिरीज चा ‘किताब त्यांनी अमळनेर साठी मिळविला. या संघाने मेहनतिने सेमी फायनल पर्यंत मजल मारली होती,विशेष म्हणजे संघात एखाद दोन तरुण वगळता सर्व 45 ते 60 वयोगटातील खेळाडूंचा सहभाग होता, तरीही उत्तम खेळी केली,यामुळे निश्चितच हा संघ या वर्षीच्या प्रीमियर लीग चा मानकरी ठरू शकेल अशी शक्यता वर्तविली जात होती मात्र सेमी फायनलमध्ये थोडी निराशा झाली.मात्र तिसऱ्या क्रमांकाचे बक्षीस मिळाल्यावर उपस्थित साऱ्यांनी या संघावर कौतुकाचा वर्षाव करत पुढील वर्षी नक्कीच हा संघ विजेता ठरणार अश्या शुभेच्छा साऱ्यांनी दिल्यात.