अमळनेर:- तालुक्यातील मारवड येथील कै. न्हानाभाऊ म. तु पाटील कला महाविद्यालयात “राष्ट्रीय सेवा योजना विभाग” व महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्रशिक्षण विभागाच्या “करिअर कट्टा” विभागाच्या संयुक्त विद्यमाने “महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी” करण्यात आली.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक करिअर कट्टा समन्वयक प्रा डॉ. माधव वाघमारे यांनी केले. याप्रसंगी प्रमुख वक्ते म्हणून क.ब.चौ.उ.म.वि. जळगाव च्या विद्यार्थी विकास विभागाचे जळगाव जिल्हा समन्वयक प्रा. डॉ. पवन पाटील हे होते. तर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान महाविद्यालयाचे जेष्ठ प्राध्यापक व्हि. डी. पाटील यांनी भुषविले. कार्यक्रमाच्या प्रारंभी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वसंत देसले व व्यासपीठावरील मान्यवरांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. प्राचार्य डॉ. वसंत देसले यांनी आपल्या भाषणातून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांची प्रासंगिकता मांडली. याप्रसंगी रासेयो स्वयंसेवक कु. प्राजक्ता निकम हीने आपल्या भाषणातून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनकार्य व घटना निर्मिती बाबत माहिती दिली. तद्नंतर कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते प्रा. डॉ. पवन पाटील यांनी डॉ. बाबासाहेबांची भारतीय लोकशाही बद्दलची विचारसरणी, त्यांचे राजकीय व आर्थिक विचार, त्यांच्या तसेच दलितांच्या उद्धारासाठी केलेल्या विविध कार्याचा आढावा घेतला. त्याचबरोबर डॉ. बाबासाहेबांना अभिप्रेत असलेली लोकशाही यावर भाष्य केले. अध्यक्षीय भाषणात प्रा. व्ही. डी पाटील यांनी डॉ. बाबासाहेबांचे कायदा मंत्री म्हणून केलेले घटना निर्मितीचे कार्य तसेच भारतात सर्वसामान्यांच्या उद्धारासाठी केलेल्या कार्याचा आढावा घेतला. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. दिलीप कदम यांनी केले. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली. सदर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महाविद्यालयातील सर्व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी सहकार्य केले.







