
पॅरोलवर सुटलेला कैलास नवघरे पोलिसांच्या जाळ्यात अडकला…
अमळनेर : रस्त्यात ट्रक अडवून ट्रक ड्रायव्हरला गळ्याला चाकू लावून त्याच्याकडून १ हजार रुपये हिसकावले आणि मालकाकडून एक लाख रुपये मागितल्याची घटना २७ रोजी पहाटे दीड वाजेच्या सुमारास गलवाडे रस्त्यावर घडली.
अनिल अश्रूबा विलग (रा कोनोसी ता. शिवगाव जि अहिल्यानगर) हा अहिल्यानगर येथील स्वप्नील झिने यांचा हायवा ट्रक नम्बर एम एच १६ , सी ई ४७९७ मध्ये भुसावळ येथून फ्लॅश पावडर घेऊन नरडाणा येथे अमळनेर मार्गे जातांना गलवाडे रस्त्यावर तीन जण मोटरसायकलवर आले आणि त्यांनी मोटरसायकल पुढे लावून ट्रक अडवला. एक जण केबिन मध्ये चढून म्हणाला की मी कैलास नवघरे आहे अमळनेरचा डॉन आहे. ट्रक ड्रायव्हर च्या गळ्याला चाकू लावून आताच्या आता एक लाख रुपये दे म्हणत खिश्यात हात घातला आणि एक हजार रुपये काढून घेतले. दुसऱ्यानेही त्याचे नाव मोझम शेख असे सांगितले. नंतर त्यांनी मालकाला फोन लावून एक लाख मागव नाहीतर तुझा खून करून टाकू आम्ही पाच खून केले असल्याचे सांगितले. ड्रायव्हर ने मालकाला फोन लावला व पैश्यांची मागणी करून खून करण्याची धमकी दिली. नंतर ट्रक एका बाजूला कॉलनीत नेला. परंतु मालकाने अमळनेर पोलिसांना फोन लावल्याने पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम , राजेंद्र कोठवदे , संतोष पवार , मिलिंद सोनार , विनोद संदानशिव , सुनील पाटील ,योगेश बागुल, संजय सोनवणे हे घटनास्थळी पोहचताच मोजम व तिसरा अनोळखी आरोपी पळून गेला. कैलास नवघरे याला मात्र अटक करण्यात आली आहे. तिघाविरुद्ध जबरी चोरी ,रस्ता अडवण्याचा गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास पोलीस उपनिरीक्षक राजू जाधव करीत आहेत.
दरम्यान कैलास नवघरे हा खून प्रकरणात सुरत येथे शिक्षा भोगत असून तो पॅरोल वर बाहेर आला होता. २७ रोजीच तो परत जाणार होता. तत्पूर्वी ट्रक चालकाला धमकावण्याच्या प्रकरणात तो पोलिसांच्या तावडीत अडकला.

