
अमळनेर:- शहरातील बसस्थानकात चोऱ्यांचे प्रमाण वाढले असून, प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. स्थानकात बसण्यासाठी आणि प्रवासासाठी मोठ्या संख्येने प्रवासी येत असतात. सुरक्षेच्या बाबतीत योग्य सीसीटीव्ही बसविले आहेत. मात्र काही सीसीटीव्ही बंद असल्यामुळे फुटेज मिळत नाही, अशी तक्रार नागरिकांची आहे.

स्थानकात एकूण आठ सीसीटीव्ही कॅमेरे बसवले असले, तरी त्यापैकी दोन ते तीन कॅमेरे वारंवार बंद असतात, अशी माहिती मिळाली आहे. परिणामी, चोरट्यांना मोकळे रान मिळत असून, प्रवाशांचे पैसे, मोबाईल, पर्स, आणि बॅगा चोरीला जाण्याच्या घटनांत वाढ झाली आहे. अनेक प्रवाशांनी या संदर्भात तक्रारी केल्या असल्या तरी अद्याप ठोस उपाययोजना झालेली नाही.
मागील काही दिवसांपूर्वी एका महिला प्रवाशाची सोन्याचे दागिने चोरीस आणि रोकड असलेली पर्स चोरीला गेली. तक्रार दाखल केल्यानंतर सीसीटीव्ही फुटेज तपासले असता, संबंधित कॅमेरे बंद असल्यामुळे काहीही हाती लागले नाही. अशा घटनांमुळे प्रवाशांमध्ये संताप आणि भीतीचे वातावरण आहे. सुरक्षा व्यवस्था सुधारण्यासाठी अधिक गस्त घालणारे कर्मचारी नियुक्त करणे, सर्व सीसीटीव्ही कॅमेरे कार्यरत ठेवणे आणि प्रवाशांसाठी जनजागृती मोहिम राबवणे आवश्यक आहे. अन्यथा, या घटनांमुळे प्रवाशांचा प्रशासनावरचा विश्वास उडण्याची शक्यता आहे. अलीकडे स्वारगेट प्रकरणावरून एसटी महामंडळ चर्चेत असतांना विद्यार्थिनी मोठ्या संख्येने प्रवास करतात त्यांचीही सुरक्षा आता बंद सीसीटीव्हीच्या भरोसे आहे.
प्रतिक्रिया…
सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची देखभाल वेळोवेळी केली जाते. काही तांत्रिक बिघाडामुळे कॅमेरे बंद पडतात, मात्र लवकरच त्यांची दुरुस्ती केली जाईल. त्यांचा कॉन्ट्रॅक्ट आता बदलला आहे. नवीन कॉन्ट्रॅक्ट दिला असून त्या कर्मचाऱ्यांना सांगून ही दुरुस्ती केली जाईल व कॅमेरे जुने झाले असल्यास त्यांना बदलले जाईल – प्रमोद चौधरी, आगारप्रमुख

