भूधारकांच्या संमतीसाठी रखडले चारीचे काम…
अमळनेर : बारा गावांच्या पाणी समस्येवर मात करणाऱ्या फापोरे बंधाऱ्याच्या ब्रिटिशकालीन पाटचारीच्या कामासाठी दोन ग्रामपंचायतींचे ठराव आणि भूसंपादनाचा अडथळा येत असल्याने काम रखडल्याचे पत्र पाट बंधारेचे उपविभागीय अभियंता सी गो पाटील यांनी आंदोलनकर्ते प्रा गणेश पवार यांना दिले आहे.
फापोरे बंधारा ब्रिटिश कालीन असून त्याची दुरुस्ती झाल्यास पुढील बारा गावांचा पाणी प्रश्न मिटणार आहे. पिण्याच्या पाण्यासह सिंचनक्षमता वाढल्यास शेती व्यवसायाला गती येणार आहे. यासाठी वारंवार शेतकऱ्यांनी आंदोलन ,बैलगाडी मोर्चा काढले होते. प्रा गणेश पवार यांनी सतत पाठपुरावा केला आहे. मात्र या कामाला सुरुवात होत नाही म्हणून पुन्हा आंदोलनाचा इशारा देण्यात आला होता.
फापोरे बुद्रुक आणि हिंगोणे खुर्द या गावांच्या ग्रामपंचायतींचे ठराव आणि ज्यांच्या जमिनी पाटचारीत येतील त्या शेतकऱ्यांची संमती अद्याप मिळालेली नाही. भूधारक यांच्या शंकेचे निराकरण करण्यासाठी उपविभागीय दंडाधिकारी अमळनेर यांच्या कार्यालयात बैठक देखील बोलावण्यात आली होती मात्र तरीही शंकेचे निरसन झाले नसल्याने पाटबंधारे विभागाला पुढील कार्यवाही करता येत नाही. अखेर पाटबंधारे विभागाने भूसंपादन कायद्यानुसार कार्यवाही करता यावी म्हणून जिल्हाधिकारीकडे प्रस्ताव पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासंदर्भात १८ मार्च रोजी प्रा गणेश पवार आमरण उपोषण करणार होते. पाटबंधारे विभागाने वरील प्रक्रियेसंदर्भात कार्यवाही सुरू असल्याचे पत्र दिल्याने आंदोलन स्थगित करून १ मे २०२५ नंतर पुन्हा आंदोलन करण्याचा इशारा प्रा पवार यांनी दिला आहे.