
पातोंडा येथील पत्रकार मोरे यांची स्तुत्य संकल्पना…
पातोंडा ता.अमळनेर:- लग्नकार्य म्हटलं की सगेसोयरे,मित्रमंडळी व हितचिंतकाना लग्नाचे आमंत्रण देण्यासाठी विविध आकर्षक,सुंदर व महागड्या पत्रिका छापल्या जातात.मात्र पातोंडा येथील पत्रकार सागर मोरे यांनी त्यांच्या विवाहाच्या आमंत्रण पत्रिकेत शासनाच्या माझी वसुंधरा अभियान व पाणी हे वाचविण्याची गरज असून ते बचत करावे असा पर्यावरण पूरक संदेश त्यांनी छापून एक आगळीवेगळी कल्पना मांडून पर्यावरणाचा संदेश देत आहे.

शासनाने जल-जंगल-जमीन वाचविणे ही काळाजी गरज असून ते लक्षात घेऊन शासनाच्या पर्यावरण मंत्रालयाने शहरी व ग्रामीण भागात माझी वसुंधरा अभियान सुरू केलेल आहे. या अभियानाच्या माध्यमातून शहरे व खेडे ही पर्यावरण पूरक वातावरण निर्मितीच्या ओघात सहभागी होत असून जल,जंगल,जमिन वाचविण्याच्या सर्व बाबी व घटकांवर काम केले जात आहे.तसेच अमीर खानच्या पाणी फौंडेशन या संस्थेच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या काना-कोपऱ्यात पाणी वाचविण्यासाठी मोठी चळवळ व मोहीम उभी राहिली आहे. अशा चळवळीत पातोंडा येथील सामाजिक कार्यकर्ते तथा पत्रकार सागर मोरे हे पाणी फौंडेशनच्या चळवळीत काम करत असून त्यासोबतच पातोंडा ग्राम पंचायतीने शासनाच्या माझी वसुंधरा अभियानात सहभाग नोंदविला असून शासनाचा हा उपक्रम व पाणी फौंडेशनची पाण्याची चळवळ ही समाजाच्या प्रत्येक घटकांत पोहोचायला म्हणून त्यांनी त्यांच्या दि.28 एप्रिल रोजी होणाऱ्या विवाह सोहळ्याच्या निमंत्रण पत्रिकेत कोणत्याही प्रकारची आकर्षक पत्रिका न बनविता साधारण पत्रिका बनवत त्याच्यात माझी वसुंधरा अभियानाचा लोगो व पाणी बचतीचा संदेश छापून त्यासोबत वृक्षवल्ली आम्हां सोयरी वनचरे व पाणी चे संरक्षण,धरतीचे रक्षण असा सुंदर संदेश असलेली संदेशात्मक पत्रिका बनवली आहे. घराघरात, समाजात ही पत्रिका पोहोचून पर्यावरणाचा प्रसार ते ह्या माध्यमातून करत आहे.त्यांच्या ह्या छोट्याशा स्तुत्य उपक्रमाचे सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, प्रशासकीय व समाज बांधवांकडून कौतुक व अभिनंदन होत आहे.








