अमळनेर:- तालुक्यातील दहिवद येथील दोन रेशन दुकानांचे परवाने निलंबित करण्यात आले असून याप्रकरणी ग्रा. पं. सदस्य शिवाजी पारधी यांनी तक्रार दाखल केली होती.
जिल्हा पुरवठा अधिकारी सुनील सूर्यवंशी यांनी याप्रकरणी निकाल देत नमूद केले आहे की, दहिवद येथील स्वस्त धान्य दुकान क्र. १४५ व १४६ यांचे तात्पुरते स्वस्त धान्य दुकानदार भरत रामकृष्ण पाटील यांचे परवाने चौकशी होई पर्यंत निलंबित करण्यात येत असून ही दुकाने नजीकच्या स्वस्त धान्य दुकानास जोडवित. तसेच तहसीलदार यांनी स्वतः दुकानांची फेरतपासणी करून वस्तुनिष्ठ अहवाल सादर करावा असे नमूद केले आहे. याप्रकरणी दहिवद येथील ग्रामपंचायत सदस्य शिवाजी पारधी व इतर आठ जणांनी स्वस्त धान्य दुकानदार तक्रार दाखल केली होती. त्यानुसार पुरवठा निरीक्षक हे चौकशीसाठी गेले असता अंत्योदय योजनेतील लाभार्थ्यांना पाच किलो कमी धान्य देणे, रजिस्टरचा ताळमेळ जुळून न येणे, ऑनलाईन पावत्या न देणे, अनियमित धान्य पुरवठा तसेच धान्याचे नमुने न ठेवणे व बोर्ड न लावणे यासह अनेक त्रुटी समोर आल्याने सदर आदेश देण्यात आला आहे.