
विशेष ग्रामस्थ सभेत ग्रामस्थांनी दिला इशारा, खासदार वाघ व जिल्हाधिकारी यांना दिले निवेदन…
अमळनेर:- तालुक्यातील बोहरे गावाचे अंशतः पुनर्वसन न करता शंभर टक्के पुनर्वसन करावे अशी मागणी विशेष ग्रामसभेत ग्रामस्थांनी करत मागणी मान्य न झाल्यास सामूहिक उपोषणाचे अस्त्र उपसणार असल्याचा इशारा दिला आहे.

पाडळसरे प्रकल्पामुळे बोहरे गावाच्या पुढील पिढ्यांचे भविष्य मात्र पूर्णतः अंधारात जाणार असून पाडळसरे धरणापासून अवघ्या दीड किलोमीटर अंतरावर असणारे व या प्रकल्पामुळे मोठ्या प्रमाणात शेतजमीन व गावठाण बुडीत होणार आहे. मात्र शासनाने या गावाला अंशतः बाधित ठरवले आहे. या प्रकल्पाअंतर्गत पाडळसरे, सात्री, धुपे,वीचखेडा व शेंदणी ही गावे पूर्णतः बाधित होत असून डांगरी, कलाली, वाळकी, विटनेर, बुधगाव व नांदेड ही गावी अंशत : बाधित होणार होती परंतु ग्रामस्थ व स्थानिक लोकप्रतिनिधी यांच्या मागणीस्तव डांगरी हे गाव पूर्णत: पुनर्वसित होत असून बोहरे गाव मात्र अंशत: बाधित म्हणून पुनर्वसित होणार आहे. बोहरे गाव तापी व बोरी नदी संगमावरील गाव असून तापीला उजव्या बाजूने अनेर नदी देखील याच ठिकाणी येऊन मिळते या तिन्ही नद्यांच्या संगमाने 2005 -2006 साली अतिवृष्टी झाली असताना तिन्ही नद्यांना पूर आल्याने संपूर्ण बोहरे गाव पाण्यात बुडाले होते. त्यावेळी धरणाचा पाया देखील झालेला नव्हता. आता मात्र १७ टीएमसी पाणी अडवले जाणार आहे, त्यामुळे जवळच असलेल्या बोहरा गावाला पूर्णपणे धोका आहे. त्यामुळे संपूर्ण गावास शंभर टक्के बाधित घोषित करून शंभर टक्के पुनर्वसन करण्यात यावे अशी मागणी करण्यात आली. यावेळी व्हिडिओ कॉन्फरन्स द्वारे जळगाव उपजिल्हाधिकारी यांच्याशी ग्रामस्थांनी संवाद साधला. या विशेष ग्रामसभेत ई गव्हर्नन्स द्वारे जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले व खासदार स्मिता वाघ यांना प्रत्यक्ष भेटून या संदर्भात निवेदन देण्यात आले आहे. यावेळी
सरपंच सुधीर पाटील, उपसरपंच देविदास फुलपगारे, विस्तार अधिकारी सुरेश कठारे, ग्रामसेवक रवींद्र सनेर, सर्व ग्रामपंचायत पदाधिकारी व मोठ्या प्रमाणावर ग्रामस्थ उपस्थित होते. सदर मागणी मान्य न झाल्यास जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सामूहिक उपोषण व आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.

