
कापूस खरेदी केंद्रही मिळाले नाही अन भरड धान्य खरेदी केंद्रही नाही…
अमळनेर : रब्बी हंगाम पणन खरेदी अंतर्गत भरड धान्य खरेदी नोंदणीला सुरुवात झाली असून जळगाव जिल्ह्यात १७ खरेदी केंद्रांना परवानगी देण्यात आली आहे. अमळनेर शेतकी संघाला डावलून पुन्हा अमळनेरच्या खरेदीसाठी एरंडोल शेतकी संघाला परवानगी देण्यात आली आहे.

शासनाने मक्याला २२२५ रुपये प्रति क्विंटल , बाजरीला २६२५ रुपये प्रति क्विंटल तर ज्वारी ला ३३७१ रुपये प्रति क्विंटल भाव जाहीर झाला आहे. तर बाजारात मका कमाल २१११ रुपये , बाजरी २५८१ रु , ज्वारी २२३५ रुपये दराने खरेदी केली जात आहे. त्यामुळे भरड धान्य खरेदी सुरू झाल्यास शेतकऱ्यांचा फायदा होणार आहे. कापूस खरेदीसाठी देखील अमळनेर ला केंद्र देण्यात आले नव्हते. त्यामुळे अमळनेर तालुक्याच्या शेतकऱ्यांवर एकप्रकारे अन्यायच होता. त्याप्रमाणे भरड धान्य खरेदी ला देखील अमळनेर शेतकी संघाला डावलण्यात आले आहे. अमळनेर ची खरेदी करण्यासाठी एरंडोल शेतकी संघाला परवानगी दिली आहे. एरंडोल संघाला एरंडोल व अमळनेर असे दोन तालुके देण्यात आले आहेत.
एरंडोल शेतकी संघाला खरेदी दिल्याने रब्बी हंगामाची नोंदणी बाजार समितीच्या आवारात देखरेख संघाच्या कार्यालयात होत असल्याबाबत जनजागृती करण्यात आलेली नाही अथवा अनेक शेतकऱ्यांना त्याची माहिती नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचा माल विकला जाऊन त्यांच्या नावावर व्यापारी फायदा घेऊ शकतात. हेच जर खरेदी अमळनेर शेतकी संघाला दिली असती तर त्याचा लाभ तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांना मिळाला असता. अमळनेर वर एवढा अन्याय का ? असा सवाल अमळनेर तालुक्यातील शेतकरी करत आहेत. अमळनेर शेतकी संघाला तोट्यातून बाहेर काढण्यासाठी खरेदीची परवानगी आवश्यक होती.
३० एप्रिल पर्यंत शेतकऱ्यांनी रब्बी हंगामाच्या भरड धान्य खरेदीसाठी नोंद करावी. त्यासाठी शेतकऱ्यांचा रब्बी हंगामाचा सात बारा आवश्यक असून त्यावर बाजरी , ज्वारी , मका या धान्याची नोंद आवश्यक आहे.