
अमळनेर : तालुक्यातील मुंगसे, पातोंडा, सोनखेडी आणि निमझरी या गावांना जोडणाऱ्या रस्त्याला आमदार अनिल पाटील यांच्या प्रयत्नाने मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून मंजुरी मिळाली व प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली.
शेतकरी व ग्रामस्थांची अनेक वर्षांपासून या रस्त्यासाठी मागणी होती. शेत मालाची वाहतूक व ग्रामीण संपर्कासाठी हा रस्ता महत्वाचा होता. या गावांना परस्पर जोडणारा पक्का व दर्जेदार रस्ता व्हावा, जेणेकरून दळणवळण सुलभ होईल, अशी त्यांची दीर्घकालीन मागणी होती. या मागणीला आमदार अनिल पाटील यांनी तत्काळ प्रतिसाद दिला. मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेच्या माध्यमातून मुंगसे- पातोंडा- सोनखेडी- निमझरी या एकूण ११.०९० कि.मी. लांबीच्या रस्त्याचे दर्जोन्नतीकरणाच्या कामासाठी निधी मंजूर करून, प्रत्यक्षात ८ रोजी या कामाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी परिसरातील शेतकरी, ग्रामस्थ मंडळ, तसेच संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
रस्त्याच्या कामाची पाहणी करण्यात आली. या विकास कामाची सुरुवात झाल्याने परिसरातील ग्रामस्थांमध्ये समाधानाचे वातावरण असून, त्यांनी आमदार पाटील यांचे आभार मानले. हा रस्ता केवळ दळणवळणाची सोय निर्माण करणार नाही, तर या गावांच्या सामाजिक व आर्थिक प्रगतीलाही नवे दालन उघडणार आहे असे आमदार पाटील यांनी सांगितले.