
अमळनेर:- काश्मीरमधील पहेलगाम येथे नुकतेच अतिरेक्यांनी हिंस्त्र पशुलाही लाजवेल असे मृत्यूचे थैमान माजवले. निरपराध लोकांना त्यांचा धर्म विचारत २७ जणांना गोळ्या घातल्या. या हत्याकांडाच्या निषेधार्थ अमळनेर येथील सकल हिंदू समाजाच्या वतीने सोमवार दिनांक २८ एप्रिल २०२५ रोजी प्रांताधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलनाचे आयोजन करण्यात आले आहे.
देशासह संपूर्ण जगात या अतिरेकी शक्तीने धुमाकूळ घातला आहे. सर्वच देश दहशतवादी संघटनांविरूध्द संघर्ष करत आहे. पहेलगाम येथे झालेल्या हिंदू नागरिकांच्या हत्याकांडात महाराष्ट्रातील ६ नागरिकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. या घटनेबद्दल संपूर्ण देशात संतप्त भावना निर्माण झाली आहे. भारत सरकारने अतिरेकी घटकांच्या विरोधात कठोर भुमिका घेतली आहे. अमळनेरातही सकल हिंदू समाजाच्या वतीने सोमवार दिनांक २८ एप्रिल रोजी सकाळी १० वाजता प्रांताधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलनाचे आयोजन करण्यात आले असून आतंकवादाच्या निषेधार्थ लढ्यात सहभागी होवून आपले योगदान द्यावे व आपले धर्म कर्तव्य बजवावे असे आवाहन सकल हिंदू समाजाच्या वतीने करण्यात आले आहे.

