35 वर्षाच्या कष्ट व कामगिरीचा केला यथोचित सन्मान...
सागर मोरे
पातोंडा ता.अमळनेर:- महाराष्ट्र व कामगार दिनानिमित्त होणाऱ्या ध्वजारोहण करण्याचा मान सरपंच हेमलता कदम यांनी न घेता ग्राम पंचायतीचे शिपाई रमेश सोनवणे यांना देऊन त्यांनी आजतागायत ग्रामपंचायतीत बजावलेल्या कामाचा यथोचित सन्मान केला.
शासकीय ध्वजारोहण म्हटलं की ज्या त्या संस्थेचा पदाने प्रमुख असलेल्या व्यक्तीला ध्वजारोहण करण्याचा प्रोटोकॉल असतो. तरीही काही ठिकाणी ध्वजारोहण करण्यावरून मानापमान नाट्य रंगविले जाते. मात्र या अपवादाला सावखेडा ग्रामपंचायत अपवाद ठरली आहे. मागच्या झालेल्या ध्वजारोहणाचा मान गावातील सैनिकाला सावखेडा ग्रामपंचायतीकडून देण्यात आला होता. समविचाराने सरपंच, उपसरपंच व सदस्य हे ध्वजारोहणाचा मान देत असतात. 35 वर्षांपासून अविरत व प्रामाणिकपणे सेवा देणारे ग्रा.पं. शिपाई रमेश सोनवणे यांना सरपंच हेमलता कदम यांनी ह्यावेळी ध्वजारोहणाचा मान दिला. आणि त्यांचा यथोचित सत्कारही यावेळी करण्यात आला. यावेळी ग्रामसेवक मनोज दहिवदकर,उपसरपंच लखन कदम, ग्रा. पं.सदस्य रवींद्रनाथ कदम,अनिल नेरकर,संजय भिल,लिलाबाई पाटील,निकिता कदम, शोभा अहिरे,प्रतिभा सोनवणे,ग्रा.प.कर्मचारी,अंगणवाडी कर्मचारी व समस्त ग्रामस्थ उपस्थित होते.