
अमळनेर – अशी ग्रामपंचायत पहिल्यांदाच बघीतली असे म्हणत श्रीमती मीनल करनवाल मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद जळगांव यांनी गांधली ग्रामपंचायतीचे कौतुक केले. त्यांचे हे एकच वाक्य आमच्या सर्व ग्रामपंचायत सदस्य, पदाधिकारी, अधिकारी व ग्रामपंचायत कर्मचारी यांच्यासाठी मोठं पारितोषिक आहे असे ग्रामपंचायतने म्हटले आहे.

मुख्य कार्यकारी अधिकारी जि. प. जळगांव श्रीमती मीनल करनवाल यांनी गांधली ग्रामपंचायतीस अचानक भेट देऊन ग्रामपंचायतीच्या विविध विकास कामांचा आढावा घेतला. तसेच सामाजिक उपक्रम मियावाकी फ़ॉरेस्ट (wipro oxygen park ) ला भेट देऊन पाहणी केली. तसेच विप्रोच्या सहकार्याने झालेल्या जलसंधारण कामाची माहिती घेतली. ग्रामपंचायतीच्या वतीने पाहुण्यांचे स्वागत गिरीष पाटील व ग्रामविकास अधिकारी प्रमोद पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. पाहुण्यांच्या हस्ते ग्रामपंचायत आवारात वृक्षारोपण करण्यात आले. ग्रामपंचायत करत असलेल्या विविध उपक्रमाबद्दल उपस्थितांचे अभिनंदन करून पुढील उपक्रममांसाठी शुभेच्छा दिल्यात. याप्रसंगी पंचायत समिती बी.डी.ओ. एन.आर.पाटील, चिंचोले, इंजी.पी.ए.पाटील, बोरसे व इतर मान्यवर उपस्थित होते.






