
अमळनेर – शहर व परिसरात दि १८ च्या रात्रीच्या सुमारास आलेल्या अवकाळी मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून, सुरू असलेल्या यात्रोत्सवावरही त्याचा मोठा परिणाम झाला आहे. रात्री ८.३० वाजता अचानक एकामागोमाग एक विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाला सुरुवात झाली. दिवसभराच्या उकाड्यानंतर आलेल्या या पावसामुळे मान्सूनपूर्व वातावरणाची अनुभूती नागरिकांना आली.

पावसामुळे शहरातील अनेक भागांत रस्त्यांवर पाणी साचले. विशेषतः बोरी नदीपात्रात सुरू असलेल्या यात्रोत्सवात व्यावसायिकांची मोठी धांदल उडाली. काही दुकानदारांचे नुकसानही झाले असून, यावर्षी अवकाळी पावसाचा फटका यात्रोत्सवाला मोठ्या प्रमाणात बसल्याची भावना व्यापाऱ्यांनी व्यक्त केली आहे. शहरातील मुख्य बाजारपेठांमध्येही पावसामुळे व्यावसायिकांची तारांबळ उडाली. मुसळधार पावसामुळे नागरिकांचीही मोठी गैरसोय झाली आहे.
