
गरिबीच्या व प्रतिकूल परिस्थितीवर मात करत दहावीच्या परीक्षेत गुणवत्ता…
अमळनेर : कुणाचे वडील वारल्याने … कुणाचे वडील दिव्यांग असल्याने …अथवा मोलमजुरी ,आर्थिक परिस्थिती कमजोर झाल्यामुळे पालकत्व दुर्बल झालेल्या पाल्यांनी इयत्ता दहावीच्या परीक्षेत सक्षम यश संपादन केले आहे.

मंगरूळ येथील स्व आबासो अनिल अंबर पाटील माध्यमिक विद्यालयातील पूर्वा संजय पाटील हिचे दहावीच्या वर्षातच पितृछत्र हरपले. घरची परिस्थिती गरिबीची असल्याने आई आणि मोठ्या बहिणीसह पूर्वा देखील दुसऱ्याच्या शेतात मजुरीला जायची. शेतात काम करून वेळ काढून अभ्यास करायची. दहावीच्या परीक्षेत तिला ९० टक्के गुण मिळवून ती केंद्रात पहिली आली आहे.

सेंट मेरी शाळेतील गौरव धनसिंग परदेशी याचे पालक धनसिंग परदेशी भाड्याच्या घरात राहतात. आणि हॉटेल वर मजुरी करतात. अत्यन्त गरिबीच्या परिस्थितीत त्याने कष्ट करून १० वि ला ९४.८० टक्के मिळवले आहेत. सानेगुरुजी विद्यालयातील साई गजानन मराठे याचे वडील दिवसभर सोडा गाडीवर सोडा विकतात. दिवसभर मुलांकडे लक्ष द्यायला वेळ नाही. परिस्थिती जेमतेम असतांनाही लहानपणापासून साई ने अभ्यास करून दहावीच्या परीक्षेत ९१.४० टक्के गुण मिळवले आहेत. शिष्यवृत्ती परीक्षेत देखील तो शाळेत पहिला येऊन पात्र ठरला होता.
मंगरूळ येथीलच तेजस्विनी विशाल पाटील हिचे वडील मंगरूळ ते अमळनेर रिक्षा चालवून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. तेजस्विनीने घरकामात आपल्या आईला सहकार्य करून अभ्यासात नियमितता ठेवली तिने ८८.६० टक्के गुण मिळवले. जयेश विठ्ठल पाटील याचे वडील बांधकाम मजूर आहेत. परिस्थिती जेमतेम दोन बहिणीच्या शिक्षणाची जबाबदारी मात्र जयेशने देखील कामाला जाऊन चिकाटीने अभ्यास केला अन ८८.४० गुण मिळवले. मंगरूळ येथीलच रोहिणी योगेश पाटील हिचे वडील दिव्यांग आहेत त्यांना धड बसता येत नाही , आजोबा चक्की चालवून कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत असत आजोबांचेही निधन झाले. रोहिणीने सर्व कामे करून अभ्यासाकडे लक्ष केंद्रित केले होते. तिने ८७ टक्के गुण मिळवून यश प्राप्त केले आहे. तर मंगरूळ शाळेचीच विशाखा संजय मैराळे हिचीही परिस्थिती बेताचीच वडील खाजगी कंपनीत कामगार आहेत. विशाखा देखील सर्व कामे करून आई वडिलांना मदत करून नियमित अभ्यास करत होती. तिने मेहनतीने ८७.८० टक्के गुण मिळवले आहेत.