
संस्थेला मिळाला गुगल मानांकनाचा सन्मान
अमळनेर:- संत परंपरेच्या पवित्र पुण्यस्मरणात आणि भाविकांच्या सेवाभावातून साकार झालेल्या श्री गोविंद महाराज भक्तनिवास या नव्याने उभारलेल्या भक्तनिवास प्रकल्पाने एका नवे अध्यायाची सुरुवात केली आहे. अध्यात्म आणि आधुनिकतेचा संगम साधत, या भक्तनिवासासाठी ऑनलाईन बुकिंग प्रणालीचा शुभारंभ शनिवारी, जेष्ठ शुद्ध एकादशीच्या दिवशी सायंकाळी ६ वाजता, पवित्र व भक्तिपूर्ण वातावरणात संपन्न झाला.

प्रतिपंढरपूर म्हणून संपूर्ण भारतात व महाराष्ट्रात नावलौकिक असलेले श्री सदगुरु सखाराम महाराज विठ्ठल-रुख्मिणी संस्थान, अमळनेर या संस्थेच्या नेतृत्वाखाली साकार झालेला श्री गोविंद महाराज भक्तनिवास, केवळ एक निवासस्थान न राहता, श्रद्धाळू आणि भाविकांच्या आध्यात्मिक विश्रांतीसाठी उभारलेले एक पवित्र स्थान असून संपूर्ण महाराष्ट्रातून व पंढरपूर येथून वर्षभर माउली भक्तांचे येणे असते म्हणून अल्पदरात व घरीबसल्या भक्तनिवास बुक करता यावा यासाठी या बुकिंग प्रणालीचे उद्घाटन करण्यात आले. वाडी मंदिर परिसरातील शांत, सात्विक आणि समाधिपर्यंत पोहचविणारे हे भक्तनिवास अत्यंत अल्पदरात भाविकांसाठी खुले करण्यात आले आहे.

Ac व Non AC रूम्स असलेल्या या अद्यावत भक्तनिवासाची रचना अशी आहे की, येथे येणाऱ्या प्रत्येक भाविकाला आध्यात्मिक शांती, निवांतता आणि आत्मिक समाधान अनुभवता येईल. या भक्तनिवासाचे उद्घाटन संत श्री प्रसाद महाराज अमळनेरकर (गादीपती, संत श्री सखाराम महाराज संस्थान) यांच्या शुभहस्ते झाले. या वेळी ट्रस्टी दिलीप बापूसाहेब देशमुख, महेश जोशी, येवले आप्पा, रमेश जोशी, अनिलदादा जोशी, महेश दुसाने, सुजितराव गुरुजी, सुनील अण्णा देव, उदय देशपांडे, भटू सोनार, उदय पाठक, बाळू पगारे यांच्यासह अनेक सेवेकरी आणि भाविक उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी या आधुनिक प्रणालीच्या माध्यमातून भाविकांना अधिक सोयीची आणि सुलभ सेवा मिळेल, असा विश्वास व्यक्त केला.
भक्तनिवास परिसराचे वैशिष्ट्य म्हणजे त्याची संतांच्या वाडीसारखी सात्विक वास्तुशुद्धता, बोरी नदीच्या काठी असलेले शांत, हवेशीर वातावरण आणि मंदिर परिसरात असलेला पवित्र ऊर्जा प्रवाह. या सर्व गोष्टी भक्तनिवासाला केवळ निवासापुरता मर्यादित ठेवत नाहीत, तर त्याला एक आध्यात्मिक केंद्र बनवतात. ऑनलाईन बुकिंगसाठी या अद्यावत वेबसाईटचा शुभारंभ करण्यात आला. https://booking.sakharammaharaj.org
🏅 गुगलचे मानांकन प्रमाणपत्र:
श्री सदगुरु सखाराम महाराज विठ्ठल-रुख्मिणी संस्थान, अमळनेर या संस्थेला अधिक गौरव मिळवून देणारी बाब म्हणजे, “संत सखाराम महाराज समाधी मंदिर” या नावाने गुगल रिव्यूजच्या मानकांनुसार गुगलचे अधिकृत रेटिंग प्रमाणपत्र मिळाले आहे. या गौरवाच्या साक्षीनेच, संत श्री प्रसाद महाराजांच्या पवित्र हस्ते या सन्मानाचे उद्घाटन करण्यात आले. हा सन्मान भक्तनिवासाच्या गुणवत्तेची, सात्विकतेची आणि भाविकांच्या समाधानाची पावती आहे. उद्घाटनप्रसंगी बोलताना संत प्रसाद महाराज म्हणाले, “ही केवळ मान्यता नव्हे, तर सखाराम महाराजांच्या कृपाशक्तीची आणि सेवेकऱ्यांच्या निष्ठेची जागतिक स्तरावर पोचलेली ओळख आहे. जे भक्त प्रेम, श्रम आणि अटूट श्रद्धा घेऊन इथे येतात, त्यांच्यासाठी ही जागा सदैव उर्जेचा स्रोत ठरते.”
गेल्या काही वर्षांमध्ये समाधी मंदिराची रचना, भक्तनिवास सुविधा, वाडी मंदिर परिसरातील विकास आणि सर्वांगीण सेवा प्रणालीमध्ये मोठ्या प्रमाणावर सुधारणा करण्यात आल्या. या सर्व बाबींचा सकारात्मक प्रभाव Google Reviews च्या माध्यमातून स्पष्टपणे दिसून आला.

