
लोकप्रतिनिधींनी दुर्लक्ष केल्यामुळे प्रशासनही दाद देईना…
अमळनेर : तालुक्यातील भरवस येथील अंडरपास बोगद्यात पाणी साचत असल्याने प्रवाश्यांचे अत्यंत हाल होत आहेत. या बोगद्याची दुरुस्ती त्वरित करावी अन्यथा तीव्र आंदोलन छेडले जाईल असा इशारा ग्रामस्थ व परिसरातील नागरिकांनी दिला आहे.
अमळनेर हुन गलवाडे ,झाडी ,भरवस मार्गे शिंदखेडा हा राज्य मार्ग सहा होता. आजही गूगल वर राज्य मार्ग सहा भरवस गावावरून जाणारा मार्ग दिसतो. मात्र हायब्रीड ऍन्यूटी रस्त्याचे काम सुरू होताच राजकीय प्रभावाखाली हा रस्ता जैतपिर , चौबारी , पाडसे मार्गे वळवण्यात आला.
समस्या कोणाला सांगावी ?
रेल्वे बोगद्यात मोठ्या प्रमाणावर पाणी साचत असल्याने मोटरसायकलस्वार , लहान वाहने जाण्यास त्रास होतो. पुलाखाली खड्डे पडल्याने अनेकदा मोटरसायकलस्वार पडतात. वाहनचालकांच्या कमरेला त्रास होतो. याबाबत आमदारांकडे तक्रार केली ते म्हणतात माझे काम नाही , खासदार लक्ष देत नाहीत , सार्वजनिक बांधकाम खाते म्हणते की हे रेल्वेचे काम आहे. तर रेल्वे प्रशासन म्हणते हा रस्ताच नाही हा नाला आहे. मात्र गेल्या कित्येक वर्षांपासून याच रस्त्यावरून आजही वाहतूक सुरू आहे. हाच राज्य मार्ग सहा होता, गूगल मॅप वर देखील नोंद आहे. परंतु प्रशासन दखल घ्यायला तयार नाही.
या रस्त्याची समस्या न सुटल्यास भरवस सह एकतास , एकलहरे गावातील ग्रामस्थ तीव्र आंदोलन करतील व यास प्रशासन जबाबदार असेल असा इशारा सरपंच दयाराम भिल , उपसरपंच प्रा संजय सोनवणे , मंगेश पाटील , बाळू पाटील , सुदाम अवचिते यांनी दिला आहे.

