
१६ जुलै रोजी प्रांत कचेरी व आमदारांच्या घरावर गावकऱ्यांचा मोर्चा
अमळनेर : तापी , बोरी आणि अनेर च्या संगमावर असलेल्या बोहरा गावाचे निम्न तापी प्रकल्पात १०० टक्के पुनर्वसन होण्यासाठी गावकऱ्यांनी १६ जुलै रोजी प्रांत कचेरी व आमदारांच्या घरावर मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.
निम्न तापी प्रकल्पाचे सर्वेक्षण करण्यात आले ते अत्यंत चुकीचे झाले आहे. बोहरा गाव नियोजित धरणाच्या एक किमी अंतरावर आहे. तसेच तापी , बोरी आणि अनेर च्या संगमावर आहे. २००५ -०६ साली अतिवृष्टी झाली होती तेव्हा संपूर्ण गावाला पाण्याचा वेढा पडला होता. ग्रामस्थ आणि जनावरांना सुरक्षित ठिकाणी हलवावे लागले होते. त्यावेळी धरणाचा पाया देखील बांधला गेला नव्हता. जेव्हा धरण होईल तेव्हा तेव्हा बोहरा गाव पूर्ण पाण्याखाली येईल. त्यामुळे तत्कालीन प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांच्याकडून गावावर अन्याय झाला आहे असे गावकऱ्यांचे म्हणणे आहे. तत्कालीन जिल्हा पुनर्वसन अधिकारी गजेंद्र पाटोळे यांनी २६ मार्च २०२५ रोजी सर्व अधिकाऱ्यांसह भेट दिली तेव्हा गावाची नवीन हाय फ्लड टेस्ट ,प्लॉट टेस्ट घरांचे संरचनात्मक ऑडिट व नवीन माती परीक्षण करण्याच्या सूचना दिल्या होत्या. परंतु तीन महिने उलटूनही त्यावर काही कारवाई झाली नाही. तसा अहवालही तयार करण्यात आला नाही. त्यामुळे गावाचे पुनर्वसन पूर्णतः होण्याबाबत आवश्यक ती कार्यवाही करावी या मागणीसाठी १६ रोजी आमदार अनिल पाटील आणि प्रांत कचेरीवर मोर्चा काढण्यात येणार आहे. योग्य कारवाई न झाल्यास १५ ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिनी ग्रामस्थ तापी ,बोरी ,अनेर नद्यांच्या संगमावर जलसमाधी घेण्याच्या विचारात आहेत. निखिल धनगर , दगडू पाटील, जयेश बागुल, बन्सीलाल भिल यांनी मोर्चाचे आयोजन केले आहे.

