
अमळनेर (प्रतिनिधी):- शहरातील हरी ओम नगर भागातील नागरिक पाणी,रस्ते व घंटागाडीच्या समस्यांनी त्रस्त असून त्या भागातील महिलांनी मुख्याधिकारी तुषार नेरकर यांची भेट घेऊन समस्यांचे निवेदन दिले.
शहरातील ढेकु रोड वरील हरी ओम नगरातील नागरिक रस्त्याच्या समस्येने हैराण आहेत.ऐन पावसाळ्यात नागरिकांना पायी चालणे ही मुश्किल झाले असून वृद्ध, महिला तसेच शालेय विद्यार्थ्यांना त्रास सहन करावा लागत आहे,त्यातच याच भागात पाणीपुरवठा योजनेचे निष्कृष्ट काम सुरू असल्याने रस्ते खोदून ठेवलेले आहेत,आधी टाकलेली पाइपलाइन अनेकदा लिकेज होत असून पाणीपुरवठा पूर्ण क्षमतेने होत नाही.रस्त्यांचे कारण देऊन पालिका प्रशासन या भागात घंटागाडी पाठवत नसल्याने नागरिकांचे आरोग्य देखील धोक्यात आले आहे. या भागातील नागरिक पालिकेचा कर नियमित भरत असून देखील त्यांना पालिकेच्या सुविधा मिळत नाहीयेत.स्वखर्चाने तेथील नागरिक पावसाळ्यात रस्त्यावर मुरुम टाकत असतात मात्र पालिकेतर्फे कुठल्या ना कुठल्या कारणाने तेच रस्ते पुन्हा खोदले गेल्याने काळी माती वर आल्याने रस्ते खराब होत आहेत. पालिकेने सुविधा पुरविण्याची मागणी या भागातील महिलांनी निवेदनाद्वारे केली आहे. यावेळी वंदना पाटील, सुषमा पवार, मीना पाटील, रुपाली पवार, सुरेखा सोनावणे, रेखा पाटील, संगीता विंचूरकर, दिपा चौधरी, सोनाली पाटील, योगिता पवार, ज्योती मोरे, रूपाली पवार, शितल कोळी तसेच या भागातील महिला उपस्थित होत्या.

