
अमळनेर: महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या भांड्यांच्या वाटप योजनेत गोंधळ झाल्याने कामगारांना रिकाम्या हाती परत जावे लागले.
यामुळे संतप्त झालेल्या शेकडो कामगारांनी प्रांत अधिकाऱ्यांच्या बंगल्यासमोर रास्ता रोको आंदोलन केले, ज्यामुळे परिसरात काही काळ तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती.
योजनेनुसार, नोंदणीकृत बांधकाम कामगारांना जीवनावश्यक भांडी वाटप केली जातात, ज्यामुळे त्यांना मोठा आधार मिळतो. मात्र, संबंधित ठेकेदाराच्या गैरहजेरीमुळे आणि कोणतीही पूर्वसूचना न देता बोलवून भांडे वाटप करण्यात आले नाहीत. ज्या कामगारांकडे वाटपासाठी १६ तारखेचे पत्र होते, ते मोठ्या संख्येने आले होते. तिथे कुणीही उपस्थित नसल्याने कामगारांचा संताप अनावर झाला. सकाळपासूनच २५० हून अधिक कामगार भांड्यांच्या प्रतीक्षेत जमले होते, परंतु पुन्हा कोणतेही वाटप झाले नाही. योजनेत नाव असूनही भांडी न मिळाल्याने कामगार सतत पुढची तारीख दिली जात असल्याने निराश झाले होते. अखेरीस, १६ तारखेलाही निराशा पदरी पडल्याने, हताश आणि संतप्त झालेल्या कामगारांनी थेट प्रांत अधिकाऱ्यांच्या बंगल्यासमोर धडक दिली. प्रांत अधिकाऱ्यांच्या बंगल्याजवळ पोहोचताच, कामगारांनी आपला संताप व्यक्त करत जोरदार घोषणाबाजी केली आणि रस्त्यावरच ठिय्या मांडला. विशेषतः कामगार महिलांनी आपला तीव्र रोष व्यक्त केला. “आम्ही तासनतास वाट पाहत थांबतो आणि शेवटी रिकाम्या हाताने परत जावे लागते,” अशी भावना अनेकांनी व्यक्त केली. त्यांच्या बोलण्यातून योजनेतील पारदर्शकतेचा अभाव आणि प्रशासनाच्या नियोजनातील कमतरता स्पष्ट दिसत होती. घटनेची माहिती मिळताच, अमळनेर पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी संतप्त कामगारांना शांत करण्याचा प्रयत्न केला आणि परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी मध्यस्थी केली. पोलिसांनी कामगारांची बाजू ऐकून घेतली, परंतु अखेर कामगारांना खाली हात माघारी फिरावे लागले.

