
संबंधित विभागांना निपटारा करण्याचे आदेश…
अमळनेर : उपविभागीय कार्यालयात लोकशाहीदिनी १० प्रकरणाबाबत तातडीने दखल घेऊन त्यावर तात्काळ निर्णय घेण्याचे संबंधित विभागाला आदेश देण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे लोकशाही दिनाच्या निकषात न बसणाऱ्या तक्रारी देखील ऐकून घेण्यात आल्यात व त्यावर योग्य मार्गदर्शन करण्यात आले.

१९ रोजी सकाळी उपविभागीय अधिकारी नितीनकुमार मुंडावरे यांच्या कार्यालयात लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात आले होते. त्यात मेहरेगाव येथील परशुराम रामदास पाटील यांनी ग्रामपंचायत ठराव करून खरेदी विक्री रद्द करून अन्याय झाल्याबाबत तक्रार केली याबाबत तातडीने गटविकास अधिकारीनी निर्णय घेण्याचे आदेश उपविभागीय अधिकारी नितीनकुमार मुंडावरे यांनी दिले. सडावण येथील मधुकर गडबड पाटील यांनी पुरावे असून आर्थिक फसवणुकीचा गुन्हा नोंद करण्याबाबत कैफियत मांडली. याबाबत पोलीस स्टेशनने योग्य ती दखल घेण्याच्या सूचना दिल्यात. मारवड येथील दिलीप बाबुराव पाटील यांनी २०२१ मधील अतिवृष्टीचे अनुदान मिळण्याबाबत तक्रार केली. तहसील कार्यालयाने कार्यवाही करावी असे आदेश दिले. सागर प्रकाश देशमुख यांनी बांधकाम विभाग आणि नगरपरिषदेने शेतात नाला सोडल्याने शेत वाहून गेल्याची तक्रार केली. नगरपरिषदेने दखल घेण्याचे आदेश देण्यात आले. कंडारी खुर्द येथील गोपाळ भिका पाटील यांनी खरेदीनंतर अतिक्रमित शेतजमीन मिळण्याची मागणी केली त्याना कलम १३८ प्रमाणे दावा दाखल करण्याचे सूचित करून अर्ज निकाली काढला.

अशोक शंकर पाटील यांनी पत्नीचा मृत्यू दाखला मिळत नसल्याची तक्रार केली. पडावद ता शिंदखेडा येथील खटाबाई कोळी यांनी तांदळी शिवारातील शेतातील विहीर पाणलोट क्षेत्रामुळे खचल्याने नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी केली. दोन्ही प्रकरणे तहसील कार्यालयाकडे सोपवण्यात आली. पिंगळवाडे येथील विलास रंगराव पाटील यांनी त्यांच्या प्रतिवादी ने बेकायदेशीर केलेला कब्जा परत मिळावी म्हणून तक्रार केली त्यावर दिवाणी न्यायालयात दावा दाखल करण्याच्या सूचना देऊन अर्ज निकाली काढण्यात आला. वसंत तुळशीराम पाटील यांनी पूर्णवाद पतपेढीचे पैसे मिळण्याची तक्रार केली हे प्रकरण सहाय्यक निबंधक कडे सोपवण्यात आले.
यावेळी डीवायएसपी विनायक कोते , तहसीलदार रुपेशकुमार सुराणा , गटविकास अधिकारी एन आर पाटील , गटशिक्षणाधिकारी रावसाहेब पाटील , कक्ष अधिकारी कैलास पाटील , तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ गिरीश गोसावी , पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम , मुख्याधिकारी तुषार नेरकर , सार्वजनिक बांधकाम विभाग , भूमिअभिलेख विभाग अधिकारी हजर होते यासाठी नायब तहसीलदार प्रशांत धमके ,प्रियंका पाटील , संगीता घोंगडे यांचे सहकार्य लाभले.

