अमळनेर:- तालुक्यातील बोरगाव येथील निक्षिता नितीन पाटील व ग्रुपची अमेरिकेत होणाऱ्या डान्स स्पर्धेसाठी निवड झाली असून त्यांनी राष्ट्रीय स्पर्धेत कांस्य पदक पटकावले आहे.
निक्षीता पाटील ही तालुक्यातील बोरगाव येथील व सध्या श्रीनगर येथे कार्यरत असलेले सीआरपीफ जवान नितीन पाटील यांची मुलगी आहे. ७ मे रोजी मुंबई येथे पार पडलेल्या इंडियन हिप-हॉप डान्स चॅम्पियनशिप ह्या राष्ट्रीय स्तरावरील डान्स स्पर्धेत आसाम, कर्नाटक, मेघालय, पंजाब, बंगाल, गोवा, गुजरात, अरुणाचल प्रदेश, तमिळनाडू, राजस्थान, तेलंगणा अश्या राज्यातील डान्स ग्रुपनी त्यांच्यामध्ये सहभाग घेतला होता. निक्षिताचा समावेश असलेल्या अंकित डान्स क्रिएशन ग्रुपने इंडियन हिपहॉप डान्स चॅम्पियनशिप यामध्ये कांस्य पदक मिळवले. त्यामुळे ह्या ग्रुपची आंतरराष्ट्रीय स्तरावर अमेरिका येथे वर्ल्ड हीप हॉप चॅम्पियनशिप स्पर्धेत निवड झाली. या ग्रुपमध्ये निक्षिता नितीन पाटील हिच्यासह सोनाली ओव्हाळ, मधुरा कणसे, अनघा दिसले, आदिती कदम, श्रावणी दाभाडे, तन्वी ओव्हाळ यांचा समावेश होता. त्यांना कोरिओग्राफर अंकित दिपक बुचकुले यांचे मार्गदर्शन लाभले. त्यांच्या या यशाबद्दल मावळ तालुक्याचे आमदार सुनील अण्णा शेळके यांनी सर्वांची आस्थेने विचारपूस करत सत्कार करून कौतुक केले आहे. यासह वडगाव नगरपंचायतीचे नगराध्यक्ष मयूर ढोरे यांनी संपूर्ण ग्रुपला शिवप्रतीमा देत गौरविले होते.
तलवारबाजी करत इंडिया बुक ऑफ रेकॉर्डस मध्ये कोरले होते नाव…
याआधी निक्षीता व तिचा लहान भाऊ मोहित यांनी तलवारबाजी करत इंडिया बुक ऑफ रेकॉर्डस मध्ये नाव कोरले होते. २२ एप्रिल रोजी पुणे येथील मर्दानी खेळ असोशिएशनच्या वतीने शिवकालीन मर्दानी खेळाचे आयोजन करण्यात आले होते. यात ३८ खेळाडूंनी भाग घेत न थांबता सलग ६५ मिनिटे तलवारबाजी करून इंडिया बुक ऑफ रेकॉर्डस मध्ये राष्ट्रीय विक्रमाची नोंद केली. या खेळाडूंमध्ये निक्षिता व मोहित यांचा समावेश होता. पुणे येथे विविध स्पर्धेत भाग घेवून नेत्रदीपक यश संपादन करून तालुक्याचे नाव उंचावल्याबद्दल निक्षिता, मोहित व कुटुंबीयांचे सर्वत्र कौतुक होत आहे.