
अमळनेर:- तालुक्यातील बोहरे ग्रामस्थांनी 16 जुलै रोजी पूर्णतः पुनर्वसन करावे व शेतजमीन न्याय निवाडा लवकर जाहीर करावा यासाठी भव्य असा आक्रोश मोर्चा आयोजित करून स्वातंत्र्य दिनी जलसमाधी व आत्मदहनाचा इशारा दिला होता.
त्या संदर्भात १३ ऑगस्ट रोजी प्रांतधिकारी यांच्या दालनात जिल्हा पुनर्वसन अधिकारी यांनी बैठक लावली असता बोहरे ग्रामस्थांच्या मागण्याबाबत प्रशासन सकारात्मक असून बोहरे गावाची परिस्थिती अधिकारी समजून आहेत व येणाऱ्या काळात बोहरे गाव 100% बाधित होईल व सध्या टप्पा दोन अंतर्गत येणारे बोहरे टप्पा एक मधे अंशत घेण्यात आले आहे व शेतजमिनीच्या न्याय निवाड्याबाबत ही काम लवकर पूर्ण होईल असे आश्वासन प्रशासनाने दिले. जिल्हा पुनर्वसन अधिकारी यांच्या विनंतीवरून बोहरे ग्रामस्थ यांनी आपले आंदोलन तूर्त स्थगित केले असून येणाऱ्या काळात अजून अश्याच सनदशीर मार्गाने पाठपुरावा सुरु राहील असे सांगितले आहे
धरणापासून जवळच असलेल्या बोहरे गावावर अन्याय होतं असून शेतजमीन न्याय निवाडा नाही, पुनर्वसन नाही तसेच प्रकल्पग्रस्तच्या लाभासाठीही ग्रामस्थ २५ वर्षापासून प्रतीक्षेत आहेत म्हणून जलसमाधी आंदोलन तूर्त स्थगित जरी केले असले तरी येत्या ग्रामसभेत ग्रामस्थ विशेष ग्रामसभा ठराव करून राष्ट्रपती, राज्यपाल व वरिष्ठ कार्यालयास पाठवणार आहे. तसेच आमदार अनिल पाटील यांच्या प्रयत्नांनी बोहरे गावाचे अंशत पुनर्वसन टप्पा एक मधे घेतल्यामुळे ग्रामस्थ यांनी त्यांचे आभार व्यक्त केले असून त्यांना शेतजमीन न्याय निवाडा व पूर्णतः पुनर्वसन बाबत पाठपुरावा व प्रयत्न करण्याबाबत विनंती केली आहे.
या वेळी जिल्हा पुनर्वसन अधिकारी विजयकुमार ढगे, प्रांताधिकारी नितीन कुमार मुंडावरे, तहसीलदार रुपेश कुमार सुराणा,तापी पाटबंधारचे यशवंत कडलग, मारवड पोलीस स्टेशनचे पीएसआय विनोद पवार, भूसंपादन विभागाचे ठाकरे व बोहरे ग्रामस्थ सुधीर पाटील, कैलास रोकडे,सुनिल अहिरराव, मनोज रत्नपारखी,शेखर पाटील, जयेश बागुल यशवंत मोरे,निखिल धनगर,प्रमोद बागुल, दीपक बोरसे,दगडू पाटील,ऋषिकेश कोळी, समाधान कोळी, योगेश कोळी आदी उपस्थित होते

