
दहिवद येथील अभिवादन कार्यक्रमात डी ए धनगर यांचे प्रतिपादन
अमळनेर – न्यायप्रिय, समाज रक्षक, कर्तव्य कठोर आदर्श राज्यकारभार आणि लोककल्याणासाठी अहोरात्र तत्पर राहिलेल्या अहिल्यादेवींचे कार्य आजही प्रेरणादायी आहे. त्यांनी केवळ माळवाच नव्हे तर संपूर्ण भारतभर घाट, मंदिरांचे जीर्णोद्धार, धर्मशाळा आणि जनसेवेच्या अनेक उपक्रमांची उभारणी केली. महिलांची फौज निर्माण करून त्यांना युद्धाचे प्रशिक्षण दिले व युद्धनिपून करण्याचे काम केले. महिला ह्या अबला, नसून सबला आहेत व विरोधकांच्या तबला वाजवण्यात तसुभरही कमी पडणार नाहीत असा आत्मविश्वास त्यांनी महिलांमध्ये निर्माण केला.त्यांचे दूरदृष्टीचे नेतृत्व, करुणामय हृदय आणि न्यायनिष्ठा ही भावी पिढ्यांसाठी एक अढळ प्रेरणास्त्रोत राहील. जातीय सलोखा टिकवण्यासाठी स्वतःच्या मुलीचा आंतरजातीय विवाह लावून दिला. असे प्रतिपादन डी ए धनगर यांनी केले. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांना २३० व्या पुण्यतिथी ( तिथीनुसार ) निम्मित दहिवद ता अमळनेर येथे विनम्र अभिवादन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता त्यात ते बोलत होते. कार्यक्रमाचे आयोजन अशोक धनगर व इतर समाज बांधवांनी केले होते. कार्यक्रमाला गावातील प्रतिष्ठित नागरिक,महिला वर्गाची व ग्रामस्थांची मोठी उपस्थिती होती. उपस्थितांच्या हस्ते स्मारकावरील प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. येळकोट येळकोट जय मल्हारचा जयघोष करण्यात आला. हे वर्ष म्हणजे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे त्रिशताब्दी जयंती वर्ष आहे. शासनाने देखील अनेक उपक्रम राबवून त्यांची जयंती साजरी केली आहे.

