प्रतिभाताई शिंदे व महेंद्र बोरसेंच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी कार्यालयावर नेला मोर्चा…
अमळनेर:- तालुक्यातील सात्री येथील ग्रामस्थांनी पुनर्वसन व पर्यायी रस्ता व इतर मागण्यांसाठी महेंद्र बोरसे, लोकसंघर्ष मोर्चाच्या नेत्या प्रतिभा शिंदे यांच्या नेतृत्वात शुक्रवारी जळगाव येथे जिल्हाधिकारी कार्यालयावर भर उन्हात मोर्चा काढला. या विषयासंर्भात आमदार अनिल पाटील यांनीही जिल्हाधिकाऱ्यांना पत्र देऊन तातडीने मागण्या मार्गी लावण्याच्या सूचना केल्या आहेत.
पाडळसरे धरणाच्या बॅक वाटरमुळे आणि बोरी नदीला येणाऱ्या पुरामुळे पावसाळयात सात्री ग्रामस्थांचा जगाशी संपर्क तुटतो. अनेक वर्ष झाली तरी पर्यायी रस्ता उपलब्ध करून देण्यात आला नाही. त्यामुळे मागील वर्षी आरुषी गावाने गमावली होती. मात्र तरीही वर्षभरात काहीही न झाल्याने ग्रामस्थांनी थेट जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली. सात्री हे गाव निम्न तापी प्रकल्प पाडळसे ह्या प्रकल्पात १०० % पूर्णतः बुडीताखाली येत असल्याने पुनवर्सन करण्यात येत आहे. त्याकरीता परिशिष्ट ‘ अ ‘ निश्चित नसतांना २००० साली स्लॅब रजिस्टर तयार करण्यात आले आहे. त्यात अनेक कुटुंबांची नोंदणी करण्यात आलेली नाही तर काही कुटुंबांची माहिती अपूर्ण घेतलेली आहे. याबाबत महेंद्र बोरसे यांनी जून २०१३ जिल्हाधिकारी यांना लक्षात आणून दिले त्यानुसार त्यांनी अमळनेर उपविभागीय अधिकारी यांच्या दालनात २९ ऑगस्ट २०१३ रोजी बैठक घेऊन संबंधित कागदपत्रांची पाहणी करुन चर्चा केली व सदर स्लॅब रजिस्टर नव्याने करण्याचे आदेश बैठकीत देण्यात आले आहेत. परंतु जिल्हाधिकारी यांच्या आदेशाची अंमलबजावणी होत नसल्याने तत्कालीन आमदार कृषिभूषण साहेबराव पाटील व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासमवेत भेट घेऊन ह्या विषयावर चर्चा केली असता त्यांना दि. १० जून २०१४ रोजी उपमुख्यमंत्री यांच्या दालनात बैठक घेण्यात आली. यात चर्चा करुन विशेष बाब म्हणून प्रस्ताव मंजुरीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत शासनास सादर करावा असे ठरले. त्यानुसार प्रस्ताव पाठविण्यात आला. सदर प्रस्ताव शासन स्तरावर न्यायप्रविष्ठ ( विचाराधीन ) आहे असे असतांना देखील २२ वर्षांपूर्वी सन २००० साली झालेल्या चुकीच्या सर्वेक्षणानुसार व तत्कालीन कुटुंब संख्या ग्राह्य धरुन जिल्हा पुनवर्सन अधिकारी यांनी पुनर्वसन गावठाणातील भूखंड वाटप करण्याबाबत दिनांक ३०/०५/२०२२ रोजी सभा आयोजित केली आहे. सदर प्लॉट वाटप प्रक्रिया बेकायदेशिर व लाभार्थ्यांवर अन्याय करणारी आहे. मदत पुनर्वसन मंत्रालयाची परवानगी घेणे आवश्यक असतांना बेकायदेशिर प्रक्रिया राबविण्यात येत असल्याने ही सभा रद्द करुन नव्याने कुटुंब सर्वेक्षण करुन वाढीव कुटुंब तसेच वाढीव घरांचा निर्णय करुनच भुखंड वाटप करण्यात यावे. त्याचप्रमाणे पुनर्वसन आणि पुनर्स्थापना कामाला गती देण्यात यावी. गृहसंपादनाचा प्रस्ताव उपविभागीय अधिकारी यांच्याकडे सन २०१८ पासून दाखल असून सदर प्रस्तावाची संयुक्त मोजणी प्रक्रिया होऊन २ वर्षे झाले तरी देखील पुढील प्रक्रियेस चालना मिळालेली नाही. तसेच भुमीसंपादन , पुनर्वसन व पुनर्स्थापना करतांना वाजवी भरपाई व पारदर्शकतेचा हक्क, प्रकल्पासाठी जमिनीचे भुसंपादन करण्यापूर्वी बाधित क्षेत्रातील कुटुंबांचे सामाजिक परिणाम निर्धारण अभ्यास करणे गरजेचे असतांना त्याकडे देखील अक्षम्य दुर्लक्ष केले जात आहे, असा आरोप मोर्चेकरी सुनिता सुनिल बोरसे, महेंद्र शालिग्राम बोरसे, निर्मलाबाई बोरसे, वर्षा बोरसे, शिवांगी बोरसे, मिराबाई भिल, रविंद्र बोरसे, पोइरंरा भिका भिक, रोहिदास बाविस्कर, पांडुरंग भिल यांच्यासह ग्रामस्थांनी केला आहे.
निगरगठ्ठ प्रशासनाची वर्षभरात काहीच उपाययोजना नाही…
मागील वर्षी पावसाळ्यात पुरामुळे डॉक्टरांकडे नेता न आल्याने आरुषी नावाच्या ११ वर्षीय मुलीला जीव गमवावा लागला होता. एक जीव गमावल्यावर त्यावेळी प्रशासकीय अधिकाऱ्यांनी चिखल तुडवत गाव गाठले होते. आणि पर्यायी रस्त्याची पाहणी केली होती. मात्र त्यानंतर वर्षभर त्याबाबत काहीच हालचाल करण्यात आली नाही. त्यामुळे निगरगठ्ठ प्रशासनाला फक्त जीव गेल्यावरच जाग येणार का ? आणि गावकऱ्यांची मागणी पूर्ण होण्यासाठी असे किती तरी जीव गमवावे लागतील ? असा खडा सवाल ग्रामस्थांनी केला आहे. ग्रामस्थांचा आक्रोश समजून घेत चुकीच्या भूखंड वाटपाचा ३० रोजीचा कार्यक्रम रद्द करून ग्रामस्थांच्या समस्या सोडवण्यासाठी अधिकाऱ्यांनी लक्ष द्यावे, अशी मागणी लोकसंघर्ष मोर्चाच्या नेत्या प्रतिभा शिंदे यांनी या केली.
आमदार अनिल पाटील यांना ग्रामस्थांनी निवेदन देताच त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना पत्र देत मंत्रालयात तातळीची बैठक आयोजित करण्याबाबत व त्याच बरोबर पर्यायी रस्त्याला तात्काळ निधी उपलब्ध करून दिला जाईल असे आश्वासन त्यांनी ग्रामस्थांना दिले.
अप्पर जिल्हाधिकारी यांनी सात्री ग्रामस्थांचे निवेदन स्वीकारून भूखंड वाटपाचे नियोजन स्थगित केले. तसेच यांसदर्भात ३० तारखेला जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनात याबाबत बैठक आयोजित केली आहे. या बैठकीत पुनर्वसन आणि सात्री ग्रामस्थांच्या विविध समस्यांवर चर्चा होऊन निर्णय घेण्यात येणार आहेत. प्रशासनाने तातडीने आंदोलकांची दखल घेऊन बैठक आयोजित केल्याने प्रतिभा शिंदे, महेंद्र बोरसे व ग्रामस्थांनी प्रशासनाचे आभार मानले आहेत व पर्यायी रस्त्याची तात्काळ व्यवस्था करण्यात यावी अशी आग्रही मागणी केली आहे.