
अमळनेर (प्रतिनिधी) अमळनेर मतदारसंघातील रस्ते विकासाला मोठी चालना देणारा ऐतिहासिक निर्णय नुकताच जाहीर झाला आहे. धार- मारवड- कळमसरे- निम या महत्त्वपूर्ण मार्गांसाठी तब्बल ₹१० कोटींचा विकासनिधी मंजूर झाला असून, या निधीतून रस्त्यांचे दर्जेदार, उच्च प्रतीचे व मानक दर्जानुसार काम करण्यात येणार आहे.

गत अनेक वर्षांपासून या मार्गावरील रस्त्यांची दुरवस्था, वाहतुकीच्या अडचणी, नागरिकांची सततची गैरसोय या सगळ्यांना पूर्णविराम देणारा हा निर्णय ठरणार आहे. ग्रामीण भागातील दळणवळणाची सोय सुधारावी, शेतीमालाच्या वाहतुकीला गती मिळावी, शिक्षण-आरोग्य सुविधांना सहज पोहचता यावे या उद्देशाने आमदार अनिल भाईदास पाटील यांनी सातत्याने पाठपुरावा करत केंद्र शासन, राज्य शासन व संबंधित विभागांशी सतत संवाद साधला होता. त्यांच्या या प्रयत्नांना अखेर यश आले आहे.
केंद्रीय रस्ते आणि पायाभूत सुविधा निधी (CRIF) अंतर्गत हा १० कोटींचा निधी मंजूर झाला आहे. हे काम सार्वजनिक बांधकाम विभाग (PWD) यांच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. या योजनेंतर्गत अमळनेर – मारवड – कळमसरे – निम हा महत्त्वपूर्ण रस्ता समाविष्ट असून, या मार्गाचे नुतनीकरण झाल्यानंतर संपूर्ण परिसराला दर्जेदार, सुरक्षित आणि जलद दळणवळणाचा लाभ मिळणार आहे. या विकासकामाचे काही महत्त्वपूर्ण फायदे, सातत्याने होणाऱ्या अपघातांना आळा,शेतीमाल वाहतुकीला वेग आणि खर्चात बचत,विद्यार्थ्यांना व कामगारांना प्रवास सुलभ, ग्रामीण भागाला तालुका-जिल्हा केंद्राशी मजबूत जोडणी, आपत्कालीन सेवांना (रुग्णवाहिका/अग्निशमन) गती मिळणार आहे.
आमदार अनिल पाटील यांनी यासाठी दिलेल्या पाठपुराव्यामुळे केंद्र व राज्य सरकारकडून मिळालेल्या या निधीबद्दल स्थानिक जनतेत समाधानाची भावना व्यक्त होत आहे. या निर्णयामुळे अमळनेरसह परिसरातील विकासाला नवीन दिशा मिळणार असल्याचे नागरिक सांगत आहेत. या कामाच्या मंजुरीबद्दल आमदार अनिल भाईदास पाटील यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले, मंत्री गिरीश महाजन, पालकमंत्री गुलाबराव पाटील, राज्यमंत्री इंद्रनील नाईक, खासदार स्मिता वाघ यांचे आभार मानले आहेत.
या मंजुरीनंतर रस्त्याचे काम लवकरच सुरू होणार असून, दर्जेदार पद्धतीने वेळेत पूर्ण करण्याचे नियोजन करण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे. ग्रामीण भागातील सर्वसामान्य नागरिकांचा दळणवळणाचा प्रश्न सुटणार असून, हा रस्ताच्या प्रगतीमुळे तालुक्याच्या विकासाचा आलेख उंचावणार आहे.




