
विकासाचा जाहीरनामा केला सादर, शहरासाठी ५०० कोटींच्या निधीतून होणार विविध विकासकामे
अमळनेर(प्रतिनिधी):- अमळनेर शहराचा झपाट्याने कायापालट होत असून माजी मंत्री तथा आमदार अनिल भाईदास पाटील,खासदार स्मिता वाघ,माजी आमदार कृषिभूषण साहेबराव पाटील, माजी नगराध्यक्षा जयश्री अनिल पाटील यांच्या दूरदृष्टीने विकासाची एक वेगळी दिशा शहराला मिळाली आहे.५०० कोटींपेक्षा जास्त निधीतून शहराचा हा विकास सुरू आहे.येणाऱ्या काळात हाच विकासाचा रथ पुढे नेण्यासाठी अमळनेर तालुका शहर विकासाचे लोकनियुक्त नगराध्यक्ष पदाचे उमेदवार जितेंद्र ठाकूर तसेच १८ प्रभागातील ३५ उमेदवारांच्या नावासमोरील शिट्टी चिन्हाचे बटण दाबून त्यांना विजयी करण्याचे आवाहन अमळनेर तालुका शहर विकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी केले आहे.

शहराच्या विकासासाठी आघाडीच्या माध्यमातून जाहीरनामा प्रकाशित करण्यात आला असून यातील अनेक कामे प्रगतीपथावर आहेत.
अमळनेर तालुका शहर विकास आघाडीचा जाहीरनामा…
शहराच्या सर्वांगीण विकासाठी शहर विकास आघाडी कटिबद्ध.
शहरासाठी १९७ कोटींची पाणीपुरवठा योजना लवकरात लवकर कार्यान्वित करून प्रत्येक घराला मुबलक पिण्याचे पाणी मिळणार.
शहरातील प्रत्येक भागात विद्यार्थ्यांसाठी अद्ययावत अभ्यासिका उभारल्या जाणार.
तरुणांसाठी प्रत्येक प्रभागात सुसज्ज व्यायामशाळा तयार होणार.
शहरातील प्रत्येक प्रभागात वयोवृद्ध,महिला,चिमुकल्यांसाठी सर्व सोयीसुविधायुक्त नाना नानी पार्क उभारण्यासाठी कटिबद्ध.
राज्याला आदर्श ठरेल अश्या क्रीडासंकुलाचे काम प्रगतीपथावर असून खेळाडूंसाठी उच्च दर्जाच्या सेवा येणाऱ्या काळात मिळतील.
डिपी रस्त्यांच्या माध्यमातून शहरातील अंतर्गत रस्त्यांचे जाळे उभे करून शहरातील दळणवळण सोयीस्कर होणार.
शहरात नव्याने उभारण्यात येत असलेल्या उपजिल्हा रुग्णालयाच्या माध्यमांतून नागरिकांना अद्ययावत आरोग्य सुविधांसोबतच त्याठिकाणी दुर्धर आजारांवरील शस्त्रक्रिया पार पडणार आहेत.
शहराचे आरोग्य सुधारण्यासाठी ठिकठिकाणी ऑक्सिजन पार्क ची निर्मिती केली जाणार आहे.
शहरात होणार प्रत्येक रस्ता दीर्घकाळ टिकणारा असणार आहे.
संत सखाराम महाराज संस्थान,मंगळ ग्रह संस्थानाचा विकास करून शहराला पर्यटनाच्या माध्यमातून देशभर नेणार असल्याचा संकल्प करण्यात आला आहे.
खुल्या भूखंडावरील उद्यानामध्ये जपानच्या धर्तीवर व्यायाम करता करता ऊर्जा निर्माण होईल असे तंत्रज्ञान उभारण्याची सोय होणार.
५.५० कोटीतून पैलाड,ताडेपुरा भागातील ताडे तलावाच्या सुशोभीकरनाला सुरवात झालेली असून तिथे पर्यटनाचे केंद्र तयार होणार.
झामी चौक तसेच गांधलीपुरा भागातील नागरिकांच्या पिण्याच्या पाण्यासाठी पाच कोटी रुपयांमधून जलकुंभाची उभारणी केली जात आहे.
२५ कोटींच्या निधीतून प्रशासकीय इमारत,महसूल इमारत तसेच पंचायत समितीच्या नवीन इमारतींचे काम पूर्णत्वाकडे असून नागरिकांना एकाच छताखाली सर्व शासकीय कार्यालये उपलब्ध होणार आहेत.
पैलाड भागातील स्मशानभूमीला आधुनिक बनविण्यासाठी १ कोटींचा निधी उपलब्ध झाला असून काम सुरी सुरू आहे.
शहरात विविध ठिकाणी सार्वजनिक स्वच्छतागृह उभारून शहराच्या स्वच्छतेची काळजी घेतली जाणार आहे.
महिलांच्या सुरक्षेच्या दृष्टीने शहरातील गुंडगिरीला आळा घालण्यासाठी शहरभर सीसीटीव्हीचे जाळे उभे राहणार आहे.
पालिकेच्या माध्यमातून लघु उद्योगांची उभारणी करून गरीब व वंचित घटकांना रोजगार उपलब्ध करून दिला जाणार आहे.
पालिकेच्या माध्यमातून फिरता दवाखाना सुरू करण्यासाठी प्रयत्न होणार.
शहरातील इतर समाजांसोबतच अल्पसंख्याक समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी अद्ययावत शादीखाना ,कब्रस्तान सुशोभीकरण,अल्पसंख्याक भागातील रस्ते यांच्या विकासावर भर दिला जाणार असून यासह विविध विकासकामे खासदार,आमदार व पालिकेच्या माध्यमातून केली जाणार आहेत.
अमळनेर शहर विकास आघाडीला मत म्हणजे शहराच्या सर्वांगीण विकासाला मत असल्याचे सुतोवाच अमळनेर तालुका व शहर विकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी केले आहे.

