
अमळनेर : नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक २०२५ पार्श्वभूमीवर शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी तसेच कोणतीही अप्रिय घटना घडू नये यासाठी अमळनेर शहरात पोलिस प्रशासनाने जिल्हाधिकारीच्या आदेशाने ३४ पैकी २३ शस्रे जमा केली आहेत. ११ जणांना शस्रे बाळगण्यास सूट देण्यात आली आहे.

सुवर्ण व्यापारी आणि बँकेचे गार्ड अशांना निवडणूक काळात देखील शस्रे बाळगण्यास जिल्हाधिकारीनी परवानगी दिली असल्याने त्यांची शस्रे जमा केलेली नाहीत अशी माहिती पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांनी दिली.
निवडणूक प्रक्रियेतील सुरक्षेच्या व्यवस्थेसाठी एकूण ११ अधिकारी, त्यामध्ये १ डीवायएसपी , १ पोलीस निरीक्षक , तसेच १६१ पोलीस कर्मचारी १४१ होमगार्डचे जवान तैनात करण्यात आले असून, आपत्कालीन परिस्थितीत तत्काळ प्रतिसाद देण्यासाठी २ ऐसारपीएफ सेक्शन अमळनेरमध्ये तैनात करण्यात आले आहेत. संभाव्य तणावपूर्ण परिस्थितींवर नियंत्रण मिळवण्यासाठी १ दंगा नियंत्रण पथक सज्ज ठेवण्यात आले आहे.
मतदान केंद्रे, संवेदनशील व अतिसंवेदनशील विभाग,प्रमुख चौक, तसेच संभाव्य गर्दी होणाऱ्या ठिकाणी विशेष गस्त सुरू करण्यात आली आहे. ड्रोन व सीसीटीव्हीच्या सहाय्याने प्रत्यक्ष देखरेखीचे यंत्रणा मजबूत करण्यात आली आहे. कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्याच्या उद्देशाने प्रत्येक मतदान केंद्रावर पोलीस कर्मचारी तैनात असणार असून, आवश्यकतेनुसार तात्काळ अतिरिक्त फोर्स हस्तगत केला जाणार आहे. शहरात फिरस्ती गस्त, नाकाबंदी व पेट्रोलिंग वाढवण्यात आले असून, वाहतूक व्यवस्थेसाठी स्वतंत्र टीम नियुक्त करण्यात आली आहे.
निवडणुका शांततेत व पारदर्शक वातावरणात पार पडाव्यात हा प्राथमिक उद्देश असून, पोलिस प्रशासनाने नागरिकांना विनाकारण गर्दी टाळण्याचे, अफवांवर विश्वास न ठेवण्याचे व मतदान प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी पोलिस प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांनी केले आहे.
बाहेरून आलेल्या लोकांनाही शहर सोडण्याच्या सूचना द्याव्यात
प्रचाराला रात्री दहानंतर बंदी असल्याने कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून बाहेरून प्रचारासाठी व इतर कामांसाठी आलेल्या व आणलेल्या लोकांनाही रात्री दहा नंतर हद्द सोडण्याच्या सूचना देण्यात याव्यात अशी मागणी निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे होत आहे. याबाबत तहसीलदार आणि मुख्याधिकारी यांना विचारणा केली असता याबाबत ते ही अनभिज्ञ असल्याचे समजते.
मतदानकाळात बाहेरून आलेले इसम काही अनुचित प्रकार करताना आढळल्यास कडक कारवाई करण्यात येईल, असे पीआय दत्तात्रय निकम यांनी सांगितले आहे.




