
अपघातग्रस्त परिसरातील नागरिकांना दिलासा; महिलांच्या पाठपुराव्यानंतर कामास तत्काळ सुरवात
अमळनेर:- शहरातील दाजीबा नगर व गळवाडे रोड परिसरात वारंवार घडणाऱ्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर स्थानिक महिलांनी उभारलेल्या आंदोलनाला अखेर यश मिळाले असून, तालुक्याचे आमदार अनिल पाटील यांच्या तत्काळ हस्तक्षेपामुळे दिनांक 26 मार्च 2026 रोजी स्पीड ब्रेकरच्या कामास सुरुवात करण्यात आली. नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने हे काम स्वखर्चातून करण्यात येत असल्याने परिसरात समाधान व्यक्त होत आहे.

दिनांक 15 मार्च 2026 रोजी दाजीबा नगर-गळवाडे रोड परिसरात एका महिलेचा दुर्दैवी अपघाती मृत्यू झाल्यानंतर स्थानिक महिलांनी संतप्त प्रतिक्रिया देत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयात धरणे आंदोलन केले होते. त्या वेळी संबंधित अधिकाऱ्यांनी लवकरच तोडगा काढण्याचे आश्वासन दिले होते. मात्र प्रत्यक्षात कामाला विलंब होत असल्याने महिलांनी थेट आमदारांकडे धाव घेतली.
महिलांच्या मागणीची गांभीर्याने दखल घेत आमदार अनिलदादांनी आठ दिवसांच्या आत स्पीड ब्रेकर उभारण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार आज आर. बी. कन्स्ट्रक्शन मार्फत प्रत्यक्ष कामाला सुरुवात करण्यात आली. परिसरातील नागरिकांनी याबद्दल समाधान व्यक्त करत आमदारांच्या तत्परतेचे कौतुक केले.
काम सुरू असताना काही राजकीय कार्यकर्त्यांनी हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केल्याने काही काळ तणाव निर्माण झाला. स्थानिक महिलांनी सुरक्षिततेच्या प्रश्नावर राजकारण करू नये, तसेच फुकटचे श्रेय घेऊ नये अशी भूमिका स्पष्टपणे मांडली. यावेळी महिलांमध्ये व काही कार्यकर्त्यांमध्ये शाब्दिक चकमक उडाली; मात्र परिस्थिती अधिक चिघळण्यापूर्वी संबंधितांनी तेथून माघार घेतली.
या संपूर्ण प्रक्रियेत महिलांनी एकजुटीने लढा दिला असून, त्यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे हा प्रश्न मार्गी लागल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली.
या वेळी सौ. नूतन पाटील, आशा नामदेव पाटील, निर्मला अरविंद पाटील, संगीता कापडणे, सुरेखा पाटील, सरला पाटील, नेहा परदेशी, तृप्ती डहाके, वैशाली पाटील, योजना पाटील, ज्योती पवार, रेखा चंद्रकांत पाटील, रेखा भागवत, मानसी पाटील, बबिता झिमबल, पुरुषोत्तम पाटील, अशोक पाटील, सुमेरसिंह पाटील यांच्यासह असंख्य नागरिक उपस्थित होते.
परिसरातील नागरिकांनी आता या रस्त्यावर कायमस्वरूपी वाहतूक नियंत्रण उपाययोजना, इशारा फलक आणि प्रकाशव्यवस्था उभारण्याची मागणीही केली आहे.




