जिल्हा कृषी अधीक्षक ठाकूर यांनी शेतकऱ्यांना केले मार्गदर्शन…
अमळनेर:- तालुक्यातील हिंगोने बु येथे दि. २८ जून रोजी स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निमित्ताने कृषी संजीवनी प्रकल्पांतर्गत कृषी संजीवनी मोहीम कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
सदर कार्यक्रमास मार्गदर्शक म्हणून जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संभाजी ठाकूर, उपविभागीय कृषि अधिकारी दादाराव जाधवर, तालुका कृषि अधिकारी भरत वारे,मंडळ कृषी अधिकारी अविनाश खैरनार,कृषी पर्यवेक्षक दिपक चौधरी, योगेश वंजारी, भूषण पाटील बी. टी एम. आत्मा, महिला बचत गट,शेतकरी बचत गट सदस्य व गावातील प्रगतशील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष सरपंच कोमलसिंग पाटील हे होते. तालुका कृषी अधिकारी यांनी सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक करून कृषी संजीवनी मोहीम दिनांक २५ जून २०२२ ते १ जुलै २०२२ दरम्यान नियोजन व राबविण्यात येणाऱ्या कृषी विषयक विविध मोहीमा बाबत मार्गदर्शन केले. उपविभागीय कृषी अधिकारी अमळनेर यांनी बीज प्रक्रिया, बियाण्याची उगण क्षमता तपासणी करणे तसेच शेतकरी गटामार्फत एकत्रित निविष्ठा खरेदी करून खर्चाची बचत करणे बाबत मार्गदर्शन केले. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संभाजी ठाकूर यांनी कृषी संजीवनी मोहिमेअंतर्गत १० टक्के रासायनिक खत बचतीच्या बाबत करावयाच्या उपाययोजना बाबत मार्गदर्शन केले. माती परीक्षण अहवालानुसार व गावातील जमीन सुपीकता निर्देशांक अहवालानुसार द्यावयाच्या रासायनिक खत मात्रेमध्ये १० टक्के खताची बचत करण्यासाठी सेंद्रिय खते जसे शेणखत, कंपोस्ट खत, गांडूळ खत, हिरवळीची खते तसेच जैविक खतांचा वापर करणेबाबत आवाहन केले,तसेच आंतर पिक पद्धतीमध्ये कडधान्य पिकांची लागवड व पिकांची फेरपालट करणे जमीनितील सेंद्रिय कर्ब वाढवणे गरजेचे असून उपयुक्त जिवाणूंची संख्या वाढविणे आवश्यक आहे . त्यासाठी रासायनीक खतांचा कार्यक्षम वापर करावा जेणेकरून जमीनीची सुपीकता टिकून राहील. विद्राव्य खतांचा कार्यक्षम वापर करणेसाठी ठिबक सिंचन पद्धतीचा अवलंब करण्यात यावा. तसेच नॅनो युरिया तंत्रज्ञान आत्मसात करून फवारणी द्वारे नत्रयुक्त व नॅनो तंत्रज्ञान आधारित द्रवरूप विद्राव्य खतांचा वापर करावा जेणेकरुन खर्च कमी होवून जमीनीची सुपीकता अबाधित राहील. सदर कार्यक्रमास अडास्का कंपनीने विकसित केलेले नॅनो तंत्रज्ञान आधारित सोडिअम व क्लोरिन मुक्त द्रवरूप विद्राव्य खते वापराबाबत कंपनी प्रतिनिधी योगेश पाटील यांनी माहिती दिली. तसेच सदर कार्यक्रमात पौष्टिक तृणधान्य योजनेअंतर्गत बाजरी व कुपोषित बालके असलेल्या कुटुंबात परसबाग भाजीपाला बियाणे मिनिकिचे वितरण मान्यवरांचे हस्ते करण्यात आले. तसेच कृषि यांत्रिकीकरण योजना सन २०२१-२२ अंतर्गत जितेंद्र पाटील यांच्या औजारे बँकेस संभाजी ठाकूर यांनी भेट देऊन मार्गदर्शन केले.