
अमळनेर : ज्यूस प्यायला आला अन मोटरसायकल चोरून नेल्याची घटना ५ रोजी रात्री आठ वाजता स्टेट बँकेसमोर घडली समोर घडली. पोलिसांनी आरोपीला शोधून अटक केली आहे.

निलेश हिम्मत संदानशीव यांची मोटरसायकल (क्रमांक एम एच १९ बी एल ६८७५) ही स्टेट बँकेसमोर ज्यूस च्या दुकानावर लावलेली असताना ज्यूस दुकानदाराने मी घरून चार्जिंग लाईट घेऊन येतो असे सांगून मोटरसायकल मागितली. चावी लावून ते मोटरसायकलला किक मारून सुरू करण्याचा प्रयत्न करत असताना मोटरसायकल सुरू झाली नाही तेव्हढ्यात एक जण आला व त्याने ज्यूस वाल्याला सांगितले की मला ज्यूस प्यायचे आहे. चावी मोटरसायकलला लावलेली असताना तो ज्यूस बनवायला लागला. थोड्यावेळात संदानशीव परत मोटरसायकल मागायला आला तेव्हा मोटरसायकल दिसली नाही. त्या अज्ञात इसमाने मोटरसायकल चोरून नेली होती. अमळनेर पोलिसात चोरीचा गुन्हा दाखल झाला होता. पोलिस निरीक्षक दत्तात्रय निकम यांनी पथकाला तांत्रिक शोध घेऊन सीसीटीव्ही फुटेज तपासायला सांगितले. पोलिसांनी चौकशी केली असता ही मोटरसायकल सैय्यद याकूब सैय्यद रेहमान रा चोपडा हल्ली मुक्काम चुनाघाणी गंधलीपुरा याने चोरल्याचे निष्पन्न झाले. हेडकॉन्स्टेबल सुनील तेली , सूर्यकांत साळुंखे , प्रशांत पाटील , उज्वल म्हस्के , अमोल कर्डयीकर , राजेंद्र देशमाने ,मयूर पाटील यांनी तांत्रिक बाबी तपासून आरोपीला मोटरसायकल सह ताब्यात घेतले.
दरम्यान आरोपीला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने आरोपीला न्यायालयीन कोठडी सुनावली असून आरोपीला जिल्हा कारागृहात रवाना करण्यात आले आहे.




