
ढेकू तांडा येथे ६ शेतकऱ्यांचा २२ बिघे मका,बाजरी,गहू हरभरा जळून खाक
अमळनेर:-वाढत्या तापमानामुळे शहर व तालुक्यात विविध ठिकाणी सुरू झालेले आगीचे तांडव सुरूच असून काल दुपारी ढेकू तांडा येथे सुमारे 22 बिघे शेतात मोठी आग लागल्याने जवळपास 6 शेतकऱ्यांचा मका,बाजरी,गहू हरबरा जळून खाक झाला आहे.

सदर आगीत शेतकरी बांधवांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.काल दुपारी 2 वाजेच्या सुमारास ढेकू तांडा येथे शेताना आग लागली जवळपास 22 बिघे शेतात ही आग पसरल्याने शेतातील मका, बाजरी, गहू, हरभरा, संपुर्ण जाळून खाक झाला.विशेष म्हणजे यावेळी हवेने रौद्ररूप धारण केले असल्याने बाजूला असलेल्या तांड्या पर्यंत आगीचे लोण पसरण्याची शक्यता निर्माण झाली होती परंतु ग्रामस्थांनी धावून जात आग विझविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केल्याने आणि अमळनेर पालिकेचे अग्निशमन दल वेळेवर पोहोचून आग विझविल्याने आग आटोक्यात येऊन पुढील अनर्थ टळला यामुळे ग्रामस्थांनी अग्निशमन दलाचे आभार मानले.अग्निशामन अधिकारी गणेश गोसावी यांच्यासह कर्मचारी दिनेश बिऱ्हाडे, जफर पठाण, आकाश संदानशिव आदींनी परिश्रम घेतले.
या शेतकऱ्यांचे झाले नुकसान
सदर आगीत एकरुखी शिवारातील भीमसिंग पन्ना जाधव यांचा मका,हिम्मत पन्ना जाधव यांची बाजरी व ठिबक नळ्या आणि पाईप,दिपक बळवंत जाधव यांचा मका व पाईप आणि ठिबक ,कादरखा मेवाती यांचा मका तसेच ठिबक नळ्या व पाईप,कदरखा मेवाती यांचा मका, ठिबक व पाईप,शकीलखा मेवाती यांच्या ठिबक नळ्या आणि पाईप आदी 6 शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.
सदर आगीचा पंचनामा तलाठी गुलाबसिंग पावरा व कृषी सहाय्यक राजेंद्र पाटील यांनी केला.यावेळी भाजपा भटके विमुक्त आघाडीचे जिल्हा सरचिटणीस किरण जाधव व गावातील ग्रामस्थ उपस्थित होते.
अग्निशमन दिनाच्या दिवशीही दोन ठिकाणी आग
14 एप्रिल रोजी अग्निशमन दिनाच्या दिवशी देखील दुपारी 2 वाजेच्या सुमारास वर्णेश्वर मंदिरा जवळ झाडांना शॉर्टसर्किटने आग लागली तसेच ग्रामीण भागात आर्डी येथील राहुल पाटील यांच्या शेतातही चाऱ्यास आग लागली, दोन्ही ठिकाणी अग्निशमन दल तात्काळ पोहोचल्याने अनर्थ टळला,कर्मचाऱ्यांनी आगीवर नियंत्रण मिळवले.याकामी अग्निशमन अधिकारी गणेश गोसावी, कर्मचारी दिनेश बिऱ्हाडे, फारुक शेख,जफर पठाण,आनंदा झिम्बल, आकाश संदानशिव,लखन कंखरे,वसीम पठाण आदींनी परिश्रम घेतले.




