
अमळनेर : जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून पीक कर्ज वाटपाच्या पद्धतीत करण्यात आलेल्या बदलामुळे निर्माण झालेली समस्या अखेर मार्गी लागली असून, शेतकऱ्यांच्या मागण्या संचालक मंडळाने मान्य केल्या आहेत. यामुळे वारसदार शेतकऱ्यांना सामाईक कर्ज घेण्यासाठी मोठा दिलासा मिळाला आहे.

चालू 2026 आर्थिक वर्षात बँकेने प्रत्येक वारसदारास स्वतंत्र कर्ज वाटप करण्याच्या सूचना दिल्याने शेतकऱ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले होते. यापूर्वी सामाईक खात्यातील सर्व वारसदारांनी एका व्यक्तीस अधिकृत करून दिलेल्या संमतीपत्रानुसार कर्ज व्यवहार सुरळीत सुरू होता. मात्र, नवीन पद्धतीमुळे कर्ज मिळण्यात अडथळे निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात होती.
या पार्श्वभूमीवर शेतकरी नेते प्रा. सुभाष पाटील यांनी १८ एप्रिल रोजी बँकेचे चेअरमन यांना निवेदन सादर केले. यावेळी संचालक मंडळासमोर विषयावर सविस्तर चर्चा झाली. चर्चेदरम्यान काही काळ खडाजंगी वातावरणही निर्माण झाले; मात्र अखेरीस सर्व बाजू ऐकून तोडगा काढण्यात आला.
संचालक मंडळाने यापूर्वीप्रमाणेच संमतीपत्र धारक वारसदारांनाच कर्ज वाटप करण्याची पद्धत कायम ठेवण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे चालू आर्थिक वर्षात कर्ज वितरण पूर्ववत पद्धतीने होणार आहे.
या बैठकीस चेअरमन संजय पवार, माजी आमदार चिमणराव पाटील, आमदार किशोर पाटील, माजी आमदार सतीश पाटील, प्रताप हरी पाटील आदी उपस्थित होते. तसेच प्रा. सुभाष पाटील, दिनेश पवार, रोहिदास सुखा पाटील यांच्या स्वाक्षरीचे निवेदन सादर करण्यात आले होते.
कोट :
“वारसदार शेतकऱ्यांना अडचण येऊ नये, यासाठी बँकेसमोर ठाम भूमिका मांडली. अखेर संचालक मंडळाने सकारात्मक निर्णय घेतल्याने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.”
— प्रा. सुभाष पाटील




