
अमळनेर : पोलीस असल्याचे सांगत मोटरसायकलस्वाराना मारहाण करत गोळी घालून जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या दोघा इसमाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर घटना २३ रोजी रात्री १० वाजता मंगरूळ जवळ घडली.

शैलेश पुखराज पाटील रा स्वामी विवेकानंद कॉलनी पैलाड भागातील रहिवासी २३ रोजी रात्री मंगरूळ येथे आपल्या मित्रांसोबत जेवायला जात असताना मागाहून चार चाकी क्रमांक एम एच ०५ जी डी ९१२५ वरील चालकाने जोरजोरात हॉर्न मारला आणि पुढे जाऊन गाडी थांबवून चालकाच्या बाजूच्या इसमाने जोरजोरात शिवीगाळ करायला सुरुवात केली. याबाबत जाब विचारला असता चालकाने मित्र राहुल याला चापट बुक्क्यांनी मारहाण करणे सुरू केले तर बाजूच्या इसमाने शैलेश च्या छातीत जोरदार बुक्का मारला आणि डाव्या हाताच्या बोटाना चावून जखमी केले. तेव्हा काही लोकांनी भांडण सोडवले त्यांनंतरही त्यातील एकाने दमबाजी करत गोळी घालून जीवे मारण्याची धमकी दिली. नन्तर त्यांनी वाहन एका बाजूला लावून मित्र बोलावून पुन्हा आम्हाला शिवीगाळ केली. शैलेशने अमळनेर पोलीस स्टेशनला फिर्याद दिल्यावरून भारतीय न्याय संहिता ११८(१) , ११५ (२) ,३५१(२) ,३५२ ,३५५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास हेडकॉन्स्टेबल प्रमोद पाटील करीत आहेत.




