
अमळनेर : तालुक्यात गलवाडे , रंजाणे, जळोद, चांदणी कुऱ्हे, देवळी, रणाईचे आदी ठिकाणी आगी लागून शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. अग्निशमन दलाच्या प्रयत्नाने रंजाणे येथे मक्याचे शेत वाचवण्यात यश आले आहे.

२६ रोजी दुपारी तीन ते चार वाजेदरम्यान गलवाडे शिवारातील गट न ३१७ मधील संजय हरचंद पाटील यांच्या शेताला आग लागल्याची माहिती भगवान पाटील यांनी कळवली काही गावकऱ्यांच्या मदतीने आग विझवण्यात आली मात्र संजय पाटील यांचा ६० ते ७० क्विंटल मका आणि ४० गुंठा जमिनीच्या ठिबक नळ्या आदी साहित्य जाळून खाक झाले. मारवड पोलीस स्टेशनला अकस्मात आगीची नोंद करण्यात आली असून तपास हेडकॉन्स्टेबल मुकेश साळुंखे करीत आहेत.
२६ रोजीच जळोद येथे रउफ खाटीक यांच्या शेतात अचानक आग लागली काही झाडे देखील जळाली मात्र अग्निशमन दल वेळीच पोहचल्याने आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले. तर २७ रोजी दुपारी मालपूर येथील एका शेतकऱ्याने आपल्या बांधावरील कचरा व पाला पाचोळा जाळल्याने आग शेजारच्या रंजाणे शिवारातील एका शेतकऱ्याच्या गव्हाच्या शेतात पसरली. सुदैवाने गहू काढलेला होता मात्र गव्हाच्या काड्या शेतात असल्याने आग पसरली काही ठिबक नळ्या जळाल्या परंतु मुख्याधिकारी गणेश शिंदे यांना कळवल्यावर तातडीने अग्निशमन बंब मागवण्यात आला गणेश गोसावी , जफर पठाण , दिनेश बिऱ्हाडे ,आकाश संदानशिव आदींनी आग आटोक्यात आणली अन्यथा आग पसरून शेजारच्या शेतात पसरून ५ ते सहा बिघे मका जळाला असता. तापमान ४४ अंशावर असताना देखील कडक उन्हात त्यात आगीची उष्णता असताना अग्निशमन दल गेल्या काही दिवसांपासून तत्परतेने पोहचून आग विझवत असल्याने त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
२७ रोजी दुपारी पावणे चार वाजेच्या सुमारास चांदणी कुऱ्हे येथील मनोज पाटील यांच्या ज्वारीच्या शेतात आग लागली. अग्निशमन दलाचे कर्मचारी फारूख शेख , मच्छीन्द्र चौधरी , वासीम पठाण ,आकाश बाविस्कर यांनी तातडीने धाव घेऊन आग विझवली. देवळी येथे पण दुपारी १२ वाजता आग लागली. त्यात साहेबराव संदनशिव यांच्या मक्याच्या शेतात ठिबक नळी पाईपलाईन जळून खाक झाली.
रणाईचे येथे शॉर्ट सर्किट मुळे ज्वारी पिकाला आग लागली असून शेतकऱ्याचे २ लाखांचे नुकसान झाले असून अमळनेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रणाईचे येथील शेतकरी जयवंत भीमराव पाटील यांच्या शेतात २१ रोजी दुपारी २ ते ३ वाजेच्या दरम्यान शॉर्ट सर्किट मुळे आग लागली यात १ हेक्टर ४ आर क्षेत्रातील ज्वारी पीक व ठिबक नळ्या जळाल्याने २ लाखांचे नुकसान झाले आहे.
जयवंत पाटील यांच्या शेतीमधील डिपिवर मागील काही दिवसापासून वारंवार शॉर्ट सर्किट होत असल्याने त्यांनी वायरमन भूषण पाटील व मनोज वाडीले यांना कळविले होते मात्र त्याकडे दुर्लक्ष झाले, वेळीच विद्युत विभागाने उपाययोजना केली असती तर ही घटना घडली नसल्याचे शेतकऱ्याचे म्हणणे आहे.
अमळनेर पोलिस स्टेशन ला अकस्मात आगीची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोहेकॉ कैलास शिंदे करत आहेत.
शॉर्ट सर्किट मुळे जुनवणे आणि पैलाड भागात शेतांमध्ये आगी लागून ज्वारी ,मका आणि ठिबक नळ्या असे सुमारे १० लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.
अमळनेर शहरातील गट नम्बर ६७५/२ मध्ये पैलाड येथील प्रवीण बाबुराव पाटील यांच्या शेतात मका काढून पडला होता. तसेच त्यांच्या शेजारील शेतात समाधान खंडू पाटील व रवींद्र कहारू पाटील यांच्याही शेतात मका काढून पडला होता. २४ रोजी दुपारी चार वाजता शेतातील विजेच्या तारांमध्ये शॉर्ट सर्किट होऊन प्रवीण पाटील यांच्या ५ बिघे शेतातील ३ लाख रुपये किमतीचा मका व ठिबक नळ्या , तसेच समाधान खंडू पाटील यांच्याही शेतातील ५ बिघे मका व ठिबक नळ्या असा ३ लाख रुपये किमतीचा माल , आणि रवींद्र कहारू पाटील यांच्या शेतातील २ लाख ८० हजार रुपये किमतीचा चार बिघे मका आणि ठिबक नळ्या असे एकूण ८ लक्ष ८० हजार रुपये किमतीचा माल संपूर्ण जाळून खाक झाला.
तर तालुक्यातील जुनवणे येथील प्रवीण प्रल्हाद महाले यांच्या शेत गट नम्बर १६८/२ व प्रभाकर यशवंत पाटील यांचे शेत गट नम्बर १६९/२ मध्ये २३ रोजी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास विद्युत पोल च्या तारांमध्ये शॉर्ट सर्किट झाल्याने दोघांच्या शेतातली ज्वारी पिके ,कणसे ठिबक नळ्या असे एकूण ८५ हजार रुपयांचे साहित्य जळून खाक झाले. अमळनेर पोलीस स्टेशनला अकस्मात आगीची नोंद करण्यात आली असून तपास हेडकॉन्स्टेबल विजय भोई करीत आहेत.
त्याचप्रमाणे तालुक्यातील रामेश्वर येथील राहुल राजाराम वंजारी यांच्या कुऱ्हे येथील गट नम्बर १३४ (३) मधील शेतात २४ रोजी सायंकाळी साडे पाच वाजेच्या सुमारास आग लागून तीन लाख रुपयांचा मका आणि ठिबक नळ्या जळून खाक झाले आहे.




