
अमळनेर : खान्देश शिक्षण मंडळाच्या कार्यकारिणीने धर्मदाय आयुक्तांच्या परवानगीशिवाय कोणतेही धोरणात्मक निर्णय घेऊ नये व आर्थिक व्यवहार करू नयेत असे निर्देश धर्मदाय आयुक्तांनी दिले असून हे शिक्षण विभागाला देखील कळवण्यात आले आहे.

खान्देश शिक्षण शिक्षण मंडळाच्या २०२५-२८ साठी निवडलेल्या नूतन कार्यकारिणीचा चेंज रिपोर्ट चिटणीस प्रा पराग पाटील यांनी धर्मदाय आयुक्तांकडे सादर केला होता. दरम्यान माजी संचालक दिलीप जैन यांनी यावर हरकत घेऊन निवडणूक बेकायदेशीर असल्याचा आरोप केला होता. मागील कार्यकरिणीला धर्मदाय आयुक्तांच्या देखरेखीखाली निवडणूक घेण्याचे आदेश दिले असताना तत्कालीन कार्यकारिणीने उच्च न्यायालयात धाव घेऊन स्थगिती मिळवली होती. त्यामुळे ती बाब न्यायालयात प्रलंबित असताना इकडे निवडणूक धर्मदाय आयुक्त वा प्रतिनिधीच्या गैरहजेरीत निवडणूक घेऊन निकाल देखील जाहीर केला होता आणि चेंज रिपोर्ट देखील सादर केला. त्यामुळे निवडणूकच बेकायदेशीर ठरते म्हणून चेंज रिपोर्ट रद्द का करू नये म्हणून खा शि मंडळ संचालक , मुख्याध्यापक शिक्षक प्रतिनिधी , चिटणीस , प्राचार्य यांना नोटिसा बजावण्यात आल्या असून धर्मदाय आयुक्तांच्या परवानगीशिवाय कोणतेही धोरणात्मक निर्णय घेऊ नये असेही निर्देश दिले आहेत.




