
अमळनेर : संत सखाराम महाराज यात्रोत्सवानिमित्त शहरातील संत सखाराम महाराज वाडी येथे दरवर्षीप्रमाणे यंदाही महिला भगिनींच्या ओटी भरण्याचा धार्मिक कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. सकाळी ११ वाजता ११ वे गादी पुरुष प. पू. प्रसाद महाराज यांच्या हस्ते हा पारंपरिक सोहळा संपन्न झाला.

यावेळी अमळनेर शहरासह तालुक्यातील विविध भागांतून महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली होती. ओटी भरण्यासाठी महिलांची लांबच लांब रांग लागलेली दिसून येत होती. महिलांसोबत पुरुष भक्तांचाही सहभाग लक्षणीय होता.
परंपरेनुसार महिलांना ब्लाउज पीस व तांदूळ देऊन ओटी भरली जाते, तर पुरुषांना तांदूळ वाटप करण्यात आले. यंदा सुमारे १८६० महिलांची ओटी प. पू. प्रसाद महाराज यांच्या हस्ते भरली गेली.
या सोहळ्यादरम्यान महिलांमध्ये विशेष उत्साह आणि आनंदाचे वातावरण पाहायला मिळाले. संत सखाराम महाराजांच्या पवित्र स्थळी, गादी पुरुषांच्या हस्ते ओटी भरून घेण्याचा योग लाभल्याने अनेक महिलांनी समाधान व्यक्त केले. भजन, कीर्तन आणि जयघोषामुळे संपूर्ण परिसर भक्तिमय झाला होता.
यात्रोत्सवानिमित्त आयोजित या पारंपरिक कार्यक्रमातून महिला भक्तांना आध्यात्मिक समाधान लाभले असून, सामाजिक व धार्मिक एकात्मतेचे दर्शन घडल्याची भावना उपस्थितांकडून व्यक्त करण्यात आली.




