
24 तास वैद्यकीय सेवा, ओआरएस-सलाईनचा पुरेसा साठा; नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन
अमळनेर:- गेल्या काही दिवसांपासून तापमानाचा पारा 42 ते 43 अंशांच्या वर गेल्याने उष्माघाताच्या रुग्णांमध्ये वाढ होण्याची शक्यता लक्षात घेऊन अमळनेर ग्रामीण रुग्णालय प्रशासन सतर्क झाले आहे. रुग्णालयात तातडीने स्वतंत्र ‘उष्माघात कक्ष’ स्थापन करण्यात आला असून सर्व सुविधा सज्ज ठेवण्यात आल्या आहेत.

वैद्यकीय अधीक्षक डॉ. प्रकाश किसन ताळे यांनी माहिती देताना सांगितले की, उष्णतेच्या लाटेमुळे नागरिकांना चक्कर येणे, उलट्या, ताप, डिहायड्रेशन यांसारखे त्रास होऊ शकतात. यावर तात्काळ उपचार मिळावेत यासाठी हा विशेष कक्ष सुरू करण्यात आला आहे.
उष्माघात कक्षातील सुविधा
या कक्षात रुग्णांसाठी शीतखोली, कुलर व थंड पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. शरीराचे तापमान तपासण्यासाठी तापमान मापक उपलब्ध आहे. तातडीच्या उपचारासाठी औषधे, ओआरएस पावडर, सलाईनचा पुरेसा साठा ठेवण्यात आला आहे. तसेच आइस पॅक, कोल्ड स्पंजिंगची व्यवस्था असून 24 तास तज्ज्ञ डॉक्टर व परिचारिकांच्या देखरेखीखाली उपचार केले जाणार आहेत.
डॉ. ताळे यांनी नागरिकांना आवाहन केले की, दुपारी 12 ते 4 या वेळेत शक्यतो उन्हात जाणे टाळावे. बाहेर पडताना डोक्यावर टोपी, स्कार्फ बांधावा. भरपूर पाणी, ताक, लिंबू सरबत प्यावे. उष्माघाताची लक्षणे दिसल्यास तात्काळ रुग्णालयात संपर्क साधावा.




