
अमळनेर : बोला सखाराम महाराज की जय म्हणत वैशाख शुद्ध पौर्णिमेला १ मे रोजी संत सखाराम महाराज यात्रोत्सवाची पालखी मिरवणूक उत्साहात पार पडली. संपूर्ण राज्यातून भाविक दर्शनाला आले होते.

परंपरेप्रमाणे सकाळी हभप प्रसाद महाराज यांनी वाडी संस्थांमध्ये लालजींची व विठ्ठल रुख्मिणी ची पूजा करून नदीत समाधीचे दर्शन घेतले. पालखीमध्ये लालजींची मूर्ती ठेवून पालखी मिरवणुकीला सुरुवात झाली. पालखीच्या पुढे भालदार चोपदार घोड्यावर , संत सखाराम महाराजांचा ट्रॅक्टरवर सजवलेला पुतळा , गरुड हनुमान यांच्या प्रतिमांचा रथ , राम लक्ष्मण ,सीता हनुमान यांचा सजीव देखावा , नगारखाना , तांबेपुरा जागृत हनुमान मित्र मंडळाचे एकमेव लेझीम पथक , तसेच भुसावळ चा रेल्वे पथकाचा बँड होता तर पालखीच्या मागे संत सखाराम महाराजांच्या चांदीच्या पादुका होत्या. त्यामागे हभप प्रसाद महाराज अनवाणी चालत होते. भाविकांची दर्शनासाठी रांग लागली होती. महाराज त्यांना खडी साखरेचा प्रसाद वाटत होते. पालखी मिरवणूक वाडी चौकातून राज होळी चौक , पान खिडकी , सराफ बाजार ,दगडी दरवाजा , फरशी रोडवर हनुमान मंदिराजवळ पालखीची फेरी मारून बोरी पुलावरून पैलाड ला पोहचली तेथून चाळीसगाव चा सद्गुरू बँड , व पैलाड येथे ढोल ताशांच्या पथकाने पालखीचे जोरदार स्वागत केले. पैलाड मार्गे नंतर पालखी रात्री समाधी स्थळावर पोहचली.
तेथे हभप प्रसाद महाराजांनी समाधी समोर अभंग म्हटला. परंपरे प्रमाणे आधी शिष्य मोहन बेलापूरकर महाराज यांच्यावर व नन्तर भाविकांवर गुलाल उधळला. आपल्या अंगावर गुलाल पडावा यासाठी भाविकांची तळमळ सुरू असते. भाविक त्याला पांडुरंगाचा आशीर्वाद समजतात. तब्बल १३-१४ तास कडक उन्हात अनवाणी चालून देखील प्रसाद महाराजानी आंनदाने नृत्य करून आकाशात पाहून देवांना वाकोल्या दाखवल्या. भाविकांनी तशाच कृती केल्या. आम्ही पृथ्वीवर देखील आनंदोत्सव साजरा करून सुखी आहोत हे वाकोल्या दाखवून सांगण्याची परंपरा आहे.
पालखी मिरवणुकीदरम्यान नियोजनप्रमाणे हभप प्रसाद महाराज भक्तांकडे पान सुपारी घेत असतात. रस्त्यात ओम लहरी भजनी मंडळ , कुसुमाई बिझिनेस ग्रुप , लायन्स क्लब , राजे संभाजी मित्र मंडळ , जैन सोशल ग्रुप यासह विविध मंडळानी प्रसाद , लस्सी ,ताक ,थंडपेय, सरबत भाविकांना वाटप केले.
पालखी मिरवणुकीत खासदार स्मिता वाघ , आमदार अनिल पाटील , माजी आमदार शिरीष चौधरी , नगराध्यक्ष डॉ परीक्षित बाविस्कर ,उपनगराध्यक्ष प्रशांत निकम , उपविभागीय अधिकारी मयूर भंगाळे , डी वाय एस पी विनायक कोते , तहसीलदार रुपेशकुमार सुराणा , नायब तहसीलदार अजय कुलकर्णी, मुख्याधिकारी गणेश शिंदे , पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांच्यासह नगरसेवक ,सामाजिक कार्यकर्ते , प्रशासकीय अधिकारी आदी सहभागी झाले होते. पोलीस व होमगार्ड यांनी पालखी मिरवणूक मार्गावर चोख बंदोबस्त ठेवला होता.




