
अमळनेर(प्रतिनिधी):- शहर व तालुक्यातील बहुतांशी सर्वच पेट्रोल पंपावर इंधनाचा तुटवडा जाणवत असून पंपाच्या बाहेरच “नो स्टॉक” चा बोर्ड लावलेला आहे.पेट्रोल व डिझेल मिळत नसल्याने नागरिकांचे मोठ्या प्रमाणात हाल पहायला मिळत आहेत.

इंधनाचा तुटवडा तसेच पेट्रोल व डिझेलचे भाव वाढणार असल्याच्या बातम्यांनी नागरिकांची इंधन भरण्यासाठी पेट्रोल पंपावर रांग पहायला मिळत आहे.पुरवठा कमी व मागणी जास्त वाढल्याने नागरिकांना पेट्रोल व डिझेल मिळत नाहीये.
लग्नसराई सुरू असल्याने अनेक वाहनधारक आपल्या कुटुंबासोबत प्रवास करत असून त्यांना इंधन टंचाईचा सामना करावा लागत आहे.पेट्रोल मिळत नसल्याने अनेकांनी आपली वाहने जागीच लाऊन दिलेली आहेत तर काही वाहनधारकांवर वाहने ढकलून नेण्याची वेळ आली आहे.
शेतीमशागतीच्या कामांवर परिणाम
तालुक्यात खरीप हंगामाच्या पूर्वतयारीला वेग आला असून ट्रॅक्टरच्या मदतीने शेतकऱ्यांनी मशागतीची कामे सुरू केली आहेत मात्र इंधनाच्या तुटवड्यामुळे यावर देखील परिणाम झालेला असून डिझेल मिळत नसल्याने शेतीची कामे खोळंबली आहेत.
पेट्रोल डिझेलचे दर वाढणार असल्याने साठेबाजी
५ राज्यांच्या निवडणुका संपल्याने आता पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढणार असल्याच्या बातम्या सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रसारित होत असल्याने पेट्रोल डिझेलची साठेबाजी काही नागरिकांकडून केली जात आहे.तर काही पेट्रोल पंप चालकांकडे पेट्रोल,डिझेल असून देखील वितरित केले जात नसल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे.प्रशासनाने बघ्याची भूमिका न घेता पेट्रोल डिझेलच्या योग्य पुरवठ्याचे नियोजन करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.



