
ट्रॅक्टर, जेसीबीसह दुचाकींच्या लांबच लांब रांगा, शेतकरी व वाहनधारकांचा संताप…
अमळनेर:-शहरातील भारत पेट्रोलियमच्या बोहरी पंपावर सोमवारी सकाळपासून नागरिकांची तुफान गर्दी उसळली होती. डिझेल व पेट्रोल भरण्यासाठी ट्रॅक्टर, जेसीबी, दुचाकी व चारचाकी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. वारंवार पेट्रोल व डिझेल पुरवठा खंडित होत असल्याने वाहनधारकांमध्ये संताप व्यक्त होत आहे.

पेट्रोल-डिझेलचा वारंवार तुटवडा होत असल्याने ज्या ठिकाणी साठा उपलब्ध झाला तेथे नागरिकांनी पंपावर एकच गर्दी होत आहे. शेतीकामांचा हंगाम सुरू असल्याने ट्रॅक्टर व जेसीबी चालकही मोठ्या प्रमाणात डिझेलसाठी आले होते. अनेकजण कॅन व बाटल्यांमधूनही इंधन भरून नेत असल्याचे चित्र होते. पंपावरील कर्मचाऱ्यांची इंधन वितरण करताना दमछाक होत होती, परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना पाचारण करावे लागण्याची शक्यता निर्माण झाली होती. मात्र, गर्दीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पुरवठा खंडित होणार की केवळ अफवेमुळे ही परिस्थिती निर्माण होतेय याबाबत पेट्रोल कंपनीकडून अधिकृत माहिती मिळालेली नाही.
शेतकरी व नोकरदारांचे हाल
शेतीच्या कामांसाठी डिझेल आवश्यक असल्याने शेतकरी वर्ग चिंतेत आहे.तर दुसरीकडे कामावर जाणाऱ्या नोकरदार वर्गालाही पेट्रोलअभावी अडचणींचा सामना करावा लागत आहे. इंधनाचा पुरवठा सुरळीत करावा व अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.




