
अमळनेर : देशाची संरक्षण यंत्रणा मजबूत करण्यासाठी आणि आपल्या सैन्याचे कमीतकमी नुकसान होण्यासाठी तालुक्यातील नांद्री येथील २१ वर्षीय तरुणाने तक्षक संरक्षण प्रणालीचा शोध लावला असून त्याचे स्वतःच्या नावावर पेटंट देखील मिळवले आहे. नांद्री येथील रितेश सुनील पाटील या बी एसस्सी रसायनशास्र च्या विद्यार्थ्याने हे संशोधन केले असून त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

रितेश पाटील हा अमळनेर तालुक्यातील नांद्री येथील रहिवासी असून तो शिरपूर येथे रसायन शास्रचे शिक्षण घेत आहे. अमेरिका सारख्या देशात संरक्षण यंत्रणा आधुनिक आहेत. होणारे संभाव्य हल्ले परतवून लावण्याची यंत्रणा त्यांच्याकडे उपलब्ध असताना आपल्या देशात मात्र शत्रू आत मध्ये घुसून बॉम्ब हल्ले , मिसाईल हल्ले करतात आणि शेकडो सैन्य मारले जाते. आपल्याला कळतच नाही की हल्ला केव्हा , कसा ,कुठे होतो? यासाठी रितेश याने ए आय तंत्रज्ञानाच्या माध्यमातून एक संरक्षक प्रणाली शोधली असून ती ३६० अंशात लिडार , उष्णता ,रडार , अल्ट्रासोनिक्स तरंग अवघ्या ०.५ सेकंदात स्कॅन करून लगेच ए आय सिस्टिमला निर्णय घेण्यास मदत करतो.
या तक्षक संरक्षक प्रणाली मुळे शत्रूची कोणतीही यंत्रणा आपल्या हद्दीत प्रवेश करताच आपल्याला कळून आपली यंत्रणा कार्यान्वित होईल. आपल्या सैनिकांची वाहने सुरक्षित करता येतील. त्यांच्यावर बॉम्ब हल्ला अथवा इतर कोणताही हल्ला करण्याचा शत्रूने प्रयत्न केल्यास अथवा जवळ प्रवेश केल्यास तक्षक यंत्रणा शोधून ते निकामी अथवा प्रति हल्ला करून नष्ट करू शकते व आपल्या सैनिकांचा बचाव करू शकते. देशाच्या सुरक्षेसाठी वाहनांमध्ये लाखो रुपयांच्या यंत्रणा वापरल्या जातात मात्र आणखी ५ लाखात तक्षक यंत्रणा कार्यान्वित करून अनेक सैनिकांचा आपण जीव वाचवू शकतो. म्हणजे देशाचे पंतप्रधान आणि राष्ट्रपती सारख्या महत्वाच्या व्यक्तींबरोबर सामान्य सैनिकांची वाहने देखील सुरक्षित होऊ शकतात. शत्रूचा धोका तात्काळ ओळखून त्याची पूर्वसूचना दिली जाईल आणि तात्काळ संरक्षण देखील दिले जाईल अशी ही तक्षक संरक्षक प्रणाली देशाच्या सुरक्षेसाठी खूप प्रभावी ठरणार आहे.
रितेश याने केलेल्या या संशोधनाचा त्याने त्याच्या नावावर पेटंट देखील मिळवला आहे. त्याने आपले संशोधन कसे कामी पडू शकते हे देशाच्या संरक्षण विभागाला कळवण्यासाठी खासदार स्मिता वाघ यांची भेट घेतली आहे.




