
शहरातील महात्मा फुले कॉलनीचा रस्ता उदाहरण आहे दस्तूर खुद्द
अमळनेर – येथील पिंपळे रोडवरील महात्मा फुले कॉलनीतील पूल (ढापा) अवजड वाहनामुळे खचला आहे. पिंपळे नाल्यावरील कॉलनीकडे जाणारा रस्त्यालगतचा पूल तुटल्याने कॉलनीत येणाऱ्या जाणाऱ्यांची गैरसोय होत आहे. ढेकू रस्ता बंद असल्यामुळे, ढेकू रस्त्याने जाणारे अवजड सर्व वाहने पिंपळे रस्त्याने वळविल्याने काँक्रीट रस्ता संपल्यावर पुढील रस्ता पूर्णपणे खड्डेमय झाला आहे तरी सार्वजनिक बांधकाम विभाग व नगर पालिकेने रस्त्याची दुरुस्ती करावी अशी मागणी नागरिक करीत आहेत.

या रस्त्यावरून ओव्हर लोडेड रेतीचे डंपर व खडीचे डंपर,धान्याच्या भरलेली वाहने, एस टी बसेस बिन दिक्कत सुसाट वाहत आहेत. त्यामुळे रस्ता मिळेल त्या बाजूने ही ओव्हर लोडेड डंपरांची रहदारी वाढलेली आहे. याचा फटका पिंपळे रोड वरील महात्मा फुले कॉलनीला व वामन नगर मधील पुलाला बसला आहे.
महात्मा फुले कॉलनीचा पूल मुळातच कमकुवत होता, आता त्यावरून अवजड वाहने जात असल्याने पुल ढासळला आहे तर वामन नगर ला जोडणाऱ्या पुलाच्या काँक्रीट भिंत देखील मोठ्या वाहनांमुळे सरकला आहे तरी ओव्हर लोडेड रेती वाहनांवर ना महसूल विभागाचे, पोलीस प्रशासनाचे,नगर पालिकेचे लक्ष नसल्याने पुलांची व रस्त्याची वाताहात होत आहे.तरी प्रशासनाने योग्य ती दखल घेऊन ओव्हर लोडेड वाहनांवर योग्य ती कारवाई करावी तसेच अमळनेर नगर परिषदेने त्वरित महात्मा फुले कॉलनीतील तुटलेल्या पुलाची दुरुस्ती करावी किंवा नव्याने बांधावा व वामन नगर मधील पुलाच्या बेसला दुरुस्ती करावी व ढेकु रोड च्या ठेकेदाराकडून पिंपळे रोडची दुरुस्ती करावी अशी जनतेतून मागणी होत आहे. कॉलनी व परिसरातील लोकांशी संपर्क साधला असता, रहिवाशांनी त्वरित पूल बांधण्यात यावा अशी मागणी केली आहे. याबाबत कॉलनीतील रहिवाशी नगरपालिकेला निवेदन देणार आहेत. तरी निवेदनाची वाट न पाहता नगर पालिकेने नागरिकांच्या मूलभूत सुविधाची काळजी घेऊन पुलाचे काम त्वरित करावे.




