
गेल्या दीड महिन्यापासून शहरभर पाण्याची बोंब, मात्र पालिकेतील सत्ताधाऱ्याना सोयरसुतक नाही…
अमळनेर:-जनतेच्या जीवावर नगरपालिकेत सत्ता मिळवून दोन दिवसाआड पाणी देण्याचे माजी आमदारांचे आश्वासन फोल ठरले आहे.याउलट अनेक वर्षानंतर यंदाच्या उन्हाळ्यात प्रथमच जनता पाण्यासाठी व्याकुळ झाली असताना मात्र पालिकेतील सत्ताधाऱ्याना सोयरसुतक नाही, गेल्या दीड महिन्यापासून शहरभर पाण्याची बोंब झाली असल्याचा आरोप माजी मंत्री तथा आमदार अनिल पाटील यांनी केला आहे.

अमळनेरची जनता नियमितपणे पाणी पट्टी कर भरत आहे. जनतेला मूलभूत सुविधा देणे पालिकेचे कर्तव्य आहे. त्यातल्या त्यात उन्हाळा लागला आहे. उष्माघाताने लोक तडफडत आहेत. दहा दहा दिवस प्यायला पाणी मिळत नाही. सर्वसामान्य जनतेला पाण्यासाठी इकडे तिकडे धाव घ्यावी लागत आहे. पाण्याचे नियोजन पूर्णपणे कोलमडले आहे. टाक्या पुरेशा भरल्या जात नाहीत. दहा दिवसाआड देखील कमी दाबाने पाणी पुरवठा होतो. माजी आमदारासह पालिकेतील सत्ताधार्यांनी आपण जनतेचे देणे लागतो. त्यांचा कर वसूल करतो तर पुरेसे पाणी दिले पाहिजे याचे भान ठेवावे.
जळोद डोहातील पाणी आटले तर गंगापुरी डोहातून पाणी आणण्याचा आटापिटा चालवला जात आहे. त्यासाठी देखील खर्च येतो मग आवर्तन का घेतले जात नाही. आवर्तनसाठी ४० लाख रुपये गेले तर जाऊ द्या! तो जनतेचाच पैसा आहे त्यांना पाणी मिळू द्या. एक काम कमी करा पण पाणी द्या. पालिकेची सत्ता बदलताच नियोजन ढेपाळले काही नगरसेवक आपल्याकडे पाणी जास्त सोडून घेतात.त्यासाठी पाणी पुरवठा कर्मचाऱ्यांवर दबाव आणत असल्याच्या तक्रारी माझ्याकडे आल्या आहेत.
सुरळीत पाणी पूरवठाबाबत जर त्वरित निर्णय न घेतल्यास शहर विकास आघाडी आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) तीव्र आंदोलन करेल याची नोंद घ्यावी.
200 कोटींची नवीन पाणीपुरवठा योजनाही थंडबस्त्यात
अमळनेरकरांची पुढील 50 ते 60 वर्षाची पाण्याची सोय व्हावी म्हणून 200 कोटींची 24 बाय 7 योजना मी धरणावरून मंजूर करून प्रत्यक्षात त्याचे काम देखील सुरू केले,शहरभर त्याचे पाईप टाकले जात आहे.मात्र स्वार्थ सोडला तर या शहरातील नागरिकांसोबत विशेष आस्था नसल्याने या नवीन पाणीपुरवठा योजनेचे कामही यांनी थंडबस्त्यात आणले आहे.मात्र मतदारसंघ व शहराचा पालक या नात्याने मी स्वतः या योजनेकडे लक्ष घालणार असून लवकरच या कामाला गती आलेली दिसेल.
ठेकेदारीच्या नादात यात्रेचे नियोजनही केले फेल
अनेक वर्षांची धार्मिक व भावनिक परंपरा असलेल्या बोरी पात्रातील यात्रोत्सवात यांनी प्रथमच ठेकेदारी व वसुलीचा प्रयोग केल्याने बाहेरगावाहून आलेले विक्रेते व पाळणेवाले नाराज होऊन संपुर्ण यात्रेचे नियोजन कोलमडले आहे.इतक्या वर्षात प्रथमच हा अनुभव आल्याचे चित्र असून स्वार्थापोटी येथेही हे फेलच ठरले आहेत.
जनतेने मोठ्या अपेक्षेने ज्या नगराध्यक्ष व नगरसेवकांना निवडून दिले त्यांना खेळण्यातले बाहुले बनवून ठेवले असून त्याची चावी मात्र आपल्याकडे ठेवली आहे,जेवढी चावी भरली तेवढेच ते चालतात.म्हणजे पालिका हातळण्यास सक्षम ते नाहीत का?जनतेने निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधींना बाहुले बनवून ठेवणे हा लोकशाहीचा सत्यानाश असून नगराध्यक्षानाही कुणाचे बाहुले बनणे शोभत नाही असा सल्लाही आमदार अनिल पाटील यांनी दिला आहे.




