
अमळनेर : शहरातील रेल्वे स्टेशन परिसरात रविवारी, दि. १० मे रोजी पहाटे सुमारे ६ वाजेच्या सुमारास एका गाईच्या पोटात लोखंडी पट्टी घुसल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून जखमी गायीच्या शरीरातून मोठ्या प्रमाणात रक्तस्राव होत होता.

रेल्वे स्टेशन रिक्षा स्टॉप व मिलचाल परिसरातील नागरिकांनी गायीला पाहताच तत्काळ मदतीसाठी धाव घेतली. व गायीला बाहेर काढले. विश्व हिंदू परिषद व बजरंग दल यांना माहिती दिली.अमळनेरचे गोरक्षक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. जखमी गाय त्यानंतर परिसरातून निघून गेल्याने गोरक्षकांनी तिचा शोध सुरू केला. तब्बल तीन तासांच्या शोधमोहीमेनंतर गाय गंगाघाट परिसरात आढळून आली. यानंतर अमळनेर येथील के. एल. झवेरी गोशाळेचे डॉ. शुभम पाटील यांच्याशी संपर्क साधण्यात आला. डॉक्टरांच्या पथकाने तात्काळ घटनास्थळी पोहोचून जखमी गाईवर उपचार सुरू केले. गायीच्या जखमेवर आठ टाके टाकण्यात आले तसेच ड्रेसिंग करून आवश्यक इंजेक्शन देण्यात आले. वेळेत उपचार मिळाल्यामुळे गायीची प्रकृती सध्या स्थिर असल्याची माहिती गोरक्षकांनी दिली. दरम्यान, परिसरात निष्काळजीपणे पडून असलेल्या लोखंडी वस्तूंमुळे मुक्या जनावरांच्या जीवाला धोका निर्माण होत. थोड्याशा निष्काळजीपणामुळे निरपराध जनावरांना जीव गमवावा लागू शकतो. नागरिकांनी परिसर स्वच्छ ठेवून काळजी घेणे आवश्यक आहे,” असे आवाहन यावेळी करण्यात आले.




