
अमळनेर : येथील ७ एप्रिल २०२६ रोजी दुपारी सुमारे तीन वाजेच्या दरम्यान अमळनेर रेल्वे स्थानकावर जीआरपी व आरपीएफचे कर्मचारी नियमित गस्त घालत असताना प्लॅटफॉर्म क्रमांक १ वर एक तरुण व त्याच्यासोबत एक अल्पवयीन मुलगी संशयास्पदरीत्या बसलेले आढळून आले. यावेळी पोलिसांना संशय आल्याने दोघांना ताब्यात घेऊन अमळनेर लोहमार्ग पोलीस चौकी येथे चौकशीसाठी आणण्यात आले.

चौकशीदरम्यान दोघांनी समाधानकारक उत्तरे न देता उडवाउडवीची उत्तरे दिल्याने पोलिसांचा संशय अधिक बळावला. त्यानंतर पोलिसांनी मुलीकडून तिच्या वडिलांचा मोबाईल क्रमांक घेत संपर्क साधला असता, संबंधित तरुणाने त्यांच्या अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून पळवून नेल्याची माहिती त्यांनी दिली. तसेच या प्रकरणी उत्तर प्रदेशातील मिर्झापूर पोलीस ठाण्यात कायदेशीर तक्रार दाखल केल्याचेही सांगितले.
मुलीच्या पालकांनी व संबंधित पोलिसांनी अमळनेर येथे येईपर्यंत दोघांना पोलिसांच्या ताब्यात ठेवण्याची विनंती केली होती. यानुसार पोलिसांनी तत्काळ कारवाई करत अल्पवयीन मुलीस बालसुधारगृहात रवाना केले. त्यानंतर तिच्या पालकांच्या व संबंधित पोलिसांच्या ताब्यात तिला सोपविण्यात आले.
दरम्यान, ताब्यात घेण्यात आलेल्या तरुणाचे नाव राजराम कुमार गुप्ता (वय २२) असे असून तो मूळचा उत्तर प्रदेशातील रहिवासी असून सध्या गुजरात येथे वास्तव्यास असल्याची माहिती समोर आली आहे. ही कारवाई नंदुरबार लोहमार्ग पोलीस पोलीस ठाणे अंतर्गत रेल्वे पोलीस ठाणे अमळनेर येथील प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल शिजवळकर, पोलीस उपनिरीक्षक प्रदीप सोनवणे, पोलीस उपनिरक्षण मधुकर विसावे, पोलीस हवालदार नरेंद्र लोंढे, घोराडे तसेच आरपीएफचे एएसआय कुलभूषण सिंग व हेड कॉन्स्टेबल नंदू पाटील यांनी केली.




