
अमळनेर : शहरातल्या संजय कृषी केंद्रावर कृषी अधिकारी व गुणवत्ता अधिकाऱ्यांनी छापे टाकून तपासणी केली असता विविध प्रकारच्या त्रुटी आढळून आल्याने चौकशीअंती परवाना अधिकारी तथा कृषी अधीक्षक कु. मु. तडवी यांनी खत विक्री परवाना कायमस्वरूपी रद्द केला आहे.

२५ मार्च रोजी जिल्हा गुणवत्ता नियंत्रण अधिकारी , कृषी विकास अधिकाऱ्यांनी अमळनेर येथे संजय कृषी केंद्रावर छापा टाकला असता त्यांना साठवणूक स्थळात नोंदणी पत्र दर्शनी भागात लावलेले आढळून आले नाही. भाव फलक लावलेले नाही , खत साठा रजिस्टर विहित नमुन्यात नाही , बिले नाहीत तर बिळांवर शेतकऱ्यांच्या सह्या नाहीत. खतांचा साठा जुळत नाही , अहवाल पाठवला जात नाही, वजन काटा उपलब्ध नाही , पॉस मशीन साठा व प्रत्यक्ष साठा यात तफावत आढळून आली. म्हणून अमळनेर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला होता आणि व्यापाऱ्याला १७ एप्रिल रोजी सुनावणीला बोलावण्यात येऊन खुलासा मागवले होता. खुलासा मोघम आणि असमाधानकारक असल्याने ही बाब खत नियंत्रण आदेश १९८५ च्या कलम ४,५,७,८,१९ ,२४,२५ ,२६ ,३५(१) (अ)(),३५(३) ,३७ चे उल्लंघन करणारी असल्याने कु मु तडवी यांनी कलम ३१(१)(२) च्या अधिकाराचा उपयोग करून संजय कृषी केंद्राचा परवाना कायमस्वरूपी रद्द केला आहे. दुकानदाराला विभागीय कृषी सहसंचालक यांच्याकडे एक महिन्याच्या आत अपील करण्याची संधी देण्यात आली असून मालक श्रेणीक संजय जैन याने अपिल केल्याचे सांगितले.




