
अमळनेर:- येथील संत सखाराम महाराज यात्रोत्सवातून एका १५ वर्षे ९ महिने वयाच्या मुलीला एका अज्ञात इसमाने फुस लावून आमिष दाखवून पळवून नेल्याची घटना ८ रोजी रात्री १० वाजता बोरी नदीच्या पात्रात घडली.

शहरातील एका तरुणाने फिर्याद दिली की त्याची मावसबहीण एक वर्षांपासून ११ वी चे शिक्षण घेण्यासाठी त्याच्याकडे आलेली आहे. ८ रोजी रात्री १० वाजता त्याची मावसबहीण व भाचीला घेऊन ते यात्रेत गेले होते. यात्रोत्सव बघत असतांना एक पांढरा शर्ट घातलेल्या सडपातळ तरुण मावस बहिणीशी काहीतरी बोलत असतांना दिसून आला. मावस भावाला संशय आला म्हणून त्याला विचारायला गेला तेव्हढ्यात पांढरे कपडे घातलेल्या तरुणाने त्याला जोरात धक्का मारून मावस बहिणीला घेऊन पळाला आणि गर्दीत गायब झाला. भावाने त्यांना दोघांना शोधण्याचा प्रयत्न केला मात्र जवळ भाची असल्याने तिचा मावस भाऊ जास्त पाठलाग करू शकला नाही. आपल्या मावसबहिणीला काहीतरी आमिष दाखवून त्यांच्या ताब्यातून पळवून नेले अशी फिर्याद अमळनेर पोलीस स्टेशनला भारतीय न्यायसंहिता कलम १३७ (२) प्रमाणे अज्ञात इसमाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास पोलीस उपनिरीक्षक नामदेव बोरकर करीत आहेत.




